महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. १० नोव्हेंबर – मुंबई – पेटीएमने पुढील वर्षी मार्चपर्यंत दुकानदारांना एक हजार कोटी रुपयांचे कर्ज वितरीत करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. दुकानदारांना कर्ज देण्याच्या योजनेअंतर्गत बिझनेस अॅप्स वापरकर्त्यांना कोणत्याही गॅरंटीशिवाय कर्ज देणं सुरू ठेवणार असल्याची माहिती सोमवारी पेटीएमनं दिली.
“सध्या आपल्याकडे १.७ कोटी दुकानदार असून त्या आधारावर व्यवसाय क्षेत्राला १ हजार कोटी रूपयांचं कर्ज देण्यात येईल. या कर्जाच्या रकमेद्वारे दुकान मालक आपला व्यवसाय डिजिटल करू शकतील किंवा व्यवसाय चालवण्यासाठी निराळ्या मार्गाचा अवलंबही करू शकतील. यामुळे दुकानदारांची कार्यक्षमता सुधारेल आणि डिजिटल भारत या मोहिमेतही त्यांना सहभागी होण्यास मदत मिळेल,” असं पेटीएमनं एका निवेदनाद्वारे सांगितलं.
सध्या मार्च महिन्यापर्यंत १ हजार कोटी रूपयांपर्यंतचं कर्ज वितरित करण्याचं लक्ष्य ठेवलं असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली. दुकानदारांच्या दररोजच्या देवाणघेवाणीवर पेटीएम त्यांना किती कर्ज द्यायला हवं हे ठरवत असतं. तसंच त्यानंतर एनबीएफसी आणि बँकांसोबत भागीदारीत काहीही तारण न ठेवता त्यांना कर्ज उपलब्ध करून दिलं जात आहे.
गेल्या आर्थिक वर्षात ५५० कोटींचं कर्ज
सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांच्या (एमएसएमई) वाढीसाठी कमी व्याज दरावर पाच लाख रुपयांपर्यंतची गॅरंटी-मुक्त कर्जात वाढ करण्यात येत असल्याचं निवेदनात म्हटलं आहे. या कर्जाची वसुली पेटीएमसह दुकानदाराच्या दैनंदिन सेटलमेंटच्या आधारे केली जाते आणि वेळेपूर्वी फेडण्यात येणाऱ्या कर्जावर कोणतीही फी आकारली जात नाही. गेल्या आर्थिक वर्षात १ लाखांहून अधिक व्यापारी भागीदारांना ५५० कोटी रुपयांची कर्जे दिली असल्याचा दावा पेटीएमकडून करण्यात आला आहे.