महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – प्रतिनिधी – दि. १२ नोव्हेंबर – ठाणे आणि मुंबई महानगर प्रदेशातील अन्य शहरांमधील प्रलंबित पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी एमएमआरडीएला दिले. यामध्ये पूर्व मुक्त मार्गाचा घाटकोपरपासून ठाण्यापर्यंत विस्तार करण्याचा बहुप्रतिक्षित प्रकल्प पुन्हा एकदा रूळावर येण्याची चिन्हे आहेत. जवळपास पाच वर्षांपासून हा प्रकल्पविस्तार विविध कारणांमुळे रखडला होता. विशेष म्हणजे, आणखी सहा प्रकल्पांना गती देण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत.
मुंबई महानगर प्रदेशातील विविध भागात विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे सक्रिय झाले आहेत. सोमवारी एमएमआरडीए अधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासमोर एमएमआर विभागातील नियोजित तसेच सुरू असलेल्या सर्व प्रकल्पांबाबत सविस्तर सादरीकरण केले. यावेळी पूर्व मुक्त मार्ग विस्तार या प्रकल्पासोबत तीन हात नाका रिमॉडेलिंग, आनंद नगर नाका ते साकेत एलिव्हेटेड महामार्ग, कोपरी ते पटणी खाडी पूल, कोलशेत ते गायमुख खाडी मार्ग, तसेच कोलशेत, कासारवडवली आणि गायमुख येथे खाडीपलीकडील भागांना जोडणारे खाडी पूल, नवीन ठाणे ग्रोथ सेंटर आदी महत्त्वाच्या प्रकल्पांची माहिती देण्यात आली. यावेळी सर्व प्रकल्पांच्या जलद अंमलबजावणीसाठी नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे निर्देश मंत्री शिंदे यांनी एमएमआरडीए आयुक्त आर. ए. राजीव यांना दिले आहेत.
पुणे, नाशिक, अहमदाबाद, जेएनपीटी अशा विविध ठिकाणांकडे जाणारी सर्व वाहतूक ठाणे शहरातून जात असल्यामुळे ठाण्यातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा शेवट ठाण्याजवळ होणार आहे. तसेच भिवंडी व कल्याण परिसरात एमएमआरडीएमार्फत ग्रोथ सेंटर विकसित करण्यात येणार असल्यामुळे वाहतुकीची समस्या अधिकच बिकट होणार आहे. या बाबी लक्षात घेऊन या प्रकल्पांची आखणी करण्यात आली आहे. ‘या प्रकल्पांच्या जलद अंमलबजावणीमुळे वाहतूक कोंडीची समस्या कायमस्वरूपी निकाली निघेल,’ असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. भविष्यातील वाढ लक्षात घेऊन या सर्व प्रकल्पांचे नियोजन केले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.