थंडीबरोबरच हवेतील प्रदूषणातही वाढ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४- ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. १३ नोव्हेंबर – राज्यात थंडीबरोबरच हवेतील प्रदूषणकारी अतिसूक्ष्म कणांच्या पातळीतही झपाटय़ाने वाढ झाली आहे. पुणे, मुंबई, दिल्ली, अहमदाबाद या शहरांत टाळेबंदीच्या कालावधीच्या तुलनेत सध्या हवेतील प्रदूषणकारी कणांच्या पातळीत तिपटीने वाढ झाली आहे. दिल्लीची स्थिती ‘अतिवाईट’, तर मुंबई आणि अहमदाबाद शहरांच्या प्रदूषणाची स्थिती ‘वाईट’ गटात मोडते आहे. या शहरांच्या तुलनेत पुण्यात मात्र अद्यापही प्रदूषणकारी कणांची हवेतील पातळी ‘मध्यम’ स्वरूपात आहे, मात्र ती समाधानकारकही नाही. दिवाळीच्या पुढील तीन दिवसांच्या कालावधीत त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. केंद्र शासनाच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयांतर्गत ‘सफर’च्या वतीने शहरातील विविध ठिकाणी दररोज हवेच्या गुणवत्तेच्या नोंदी घेतल्या जातात. पीएम २.५ आणि पीएम १० (पार्टिक्युलेट मॅटर) या अतिसूक्ष्म कणांचे हवेतील प्रमाण प्रामुख्याने तपासले जाते. पीएम २.५ ची हवेतील पातळी १ ते ५० मायक्रॉन असल्यास स्थिती उत्तम समजली जाते. ५० ते १०० समाधानकारक, १०० ते २०० मध्यम, २०० ते ३०० वाईट स्थिती समजली जाते. ३०० मायक्रॉनच्या पुढील प्रमाण अतिधोकादायक समजले जाते. टाळेबंदीच्या काळामध्ये रस्त्यांवर केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहने धावत होती. त्यामुळे प्रदूषणाचे प्रमाण झपाटय़ाने खाली आले होते. मात्र, त्यात आता पुन्हा वाढ झाली आहे. थंडीच्या कालावधीमध्ये ही वाढ अधिकच ठळकपणे जाणवत आहे.

सफरकडून नोंदविण्यात आलेल्या हवेच्या गुणवत्तेनुसार टाळेबंदीच्या कालावधीत मुंबईत हवेतील प्रदूषणकारी कणांचे प्रमाण ७० ते ७५ मायक्रॉन इतके होते.

दिल्लीत ते शंभरच्या आसपास, तर अहमदाबादमध्ये प्रदूषणकारी कणांचे प्रमाण सुमारे ९० मायक्रॉनपर्यंत खाली आले होते. त्या वेळीही पुणे शहरात इतर शहरांच्या तुलनेत कमी म्हणजे ६० ते ६५ मायक्रॉन इतके प्रदूषणकारी कणांचे हवेतील प्रमाण होते. त्यात आता सुमारे तिपटीने वाढ झाली आहे. त्यामुळे शहरांत पुन्हा प्रदूषणाची पातळी गंभीर रूप धारण करीत आहे. दिवाळीत फटाक्यांच्या वापर वाढल्यास त्यात आणखी वाढ होऊ शकते.

हवेतील प्रदूषणकारी कणांचे प्रमाण (मायक्रॉन)

शहर ——–टाळेबंदीत—-सध्या

पुणे————६०—- —१७५

मुंबई———–७०——-२०५

दिल्ली———–११०——३२५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *