महाराष्ट्र २४- ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. १५ नोव्हेंबर – नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी संध्याकाळी कोथिंबिरीची आवक 2 लाख 25 हजार जुडी इतकी आल्याने किमान दर चार रुपयांवर घसरला. कांदापात वगळता इतर पालेभाज्यांची आवकही दुपटीहून अधिक असल्याने भाव कमी मिळाले.
मागील महिन्यात कोथिंबिरीने 150 ते 180 रुपये जुडी असा टप्पा गाठला होता. त्यावेळी आवक 80 ते 90 हजार जुडय़ा होती. काल संध्याकाळी बाजार समितीत कोथिंबिरीची आवक 2 लाख 25 हजार जुडय़ा होती. गावठी कोथिंबिरीला किमान 4, कमाल 12 व सरासरी 8, तर हायब्रीडला अनुक्रमे 5-15-10 रुपये जुडी दर मिळाला. मेथीची आवक 60 हजार 500 जुडी व दर 5-16-10 असे होते. मागील महिन्यात मेथीची आवक अवघी दहा टक्के होती, तर भाव 60वर पोहचला होता. आता शेपूची आवक 40 हजार 300 व दर किमान 5 मिळाला.
फळभाज्यांचे दर स्थिर
गेल्या महिन्यात 120 रुपये किलोवर पोहोचलेल्या वांग्यांना सध्या किमान 30, सिमला मिरचीला सध्या किमान 50, टोमॅटोची आवक 950 क्विंटल व दर 10-35-25 असे स्थिर आहेत.
भाज्यांचे किमान, कमाल, सरासरी दर प्रतिकिलो व कंसात आवक क्विंटलमध्ये पुढीलप्रमाणे :
फ्लॉवर : 4-20-12 (383);
कोबी : 6-32-21 (328);
भोपळा : 3-8-5 (584);
कारले : 12-25-16 (258);
दोडका : 12-33-25 (84);
गिलके : 16-33-25 (48);
भेंडी : 15-33-29 (26);
गवार : 35-60-45 (4).