जैसलमेर सीमेवर जवानांसोबत दिवाळी ; चीनच्या भूमिकेवर मोदींची सडकून टीका,

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४- ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. १५ नोव्हेंबर – जवानांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी जैसलमेरला पोहोचलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अप्रत्यक्षपणे चीनवर निशाणा साधला आहे. भारताला आव्हान दिले गेले, तर जोरदार प्रत्युत्तर मिळेल. काही जण अजूनही विस्तारवादी मानसिकतेत अडकले आहेत. १८ व्या शतकातील ही मानसिकता म्हणजे एक विकृती असल्याचे मोदी म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाव न घेता शनिवारी चीनच्या भूमिकेवर सडकून टीका केली. जैसलमेर येथे सीमेवरील जवानांसोबत मोदी यांनी दिवाळी साजरी केली. यावेळी आयोजित कार्यक्रमात त्यांनी जवानांना आणि देशवासियांना संबोधित केले. मोदी म्हणाले, ‘आज जगाला हे कळतंय की भारत आपल्या हितांविरोधात कोणत्याही किंमतीत थोडीही तडजोड करणार नाही. भारताची शान आणि उंची आपल्या शक्ती आणि पराक्रमामुळं टिकून आहे. आपण देशाला सुरक्षित ठेवलं आहे त्यामुळे आज भारत जागतीक व्यासपीठांवर प्रखरतेने आपली बाजू मांडत आहे.’

‘आंतरराष्ट्रीय सहकार्य कितीही पुढे आलेलं असलं आणि समीकरणं कितीही बदलली असली तरी आपल्याला हे विसरता येणार नाही की, सतर्कता हाच आपली सुरक्षेचा मार्ग आहे. सजगता हीच सुख-चैनीचा पाठिंबा आहे. सामर्थ्यचं विजयाचा विश्वास आहे. सक्षमताच शांतीचा पुरस्कार आहे,’ अशा शब्दांत मोदींनी देशाच्या सुरक्षेबाबत गांभीयार्ने विचार करणं गरजेचं असल्याचं सांगितलं.

मोदी पुढे म्हणाले, जागाचा इतिहास आपल्याला हेच सांगतो की, केवळ तिचं राष्ट्रे सुरक्षित असतात आणि पुढे जातात ज्यांच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीशी मुकाबला करण्याची क्षमता असते. जगातील कोणतीच ताकद आपल्या वीर जवानांना देशाच्या सीमांची सुरक्षा करण्यापासून रोखू शकत नाही.

मोदींनी चीनकडून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सुरू असलेल्या कुरघोड्यांवर भाष्य केलं. ‘भारत आपल्या सुरक्षेशी जराही तडजोड करणार नाही, हे आज संपूर्ण जगाला माहीत आहे. भारताची ही नवी ओळख देशाच्या जवानांमुळे आहे. तुमच्यामुळेच देश सुरक्षित आहे. तुमच्यामुळेच देश आज जागतिक व्यासपीठांवर आपली भूमिका अतिशय ठोसपणे मांडतोय,’ अशा शब्दांत मोदींनी जवानांचं कौतुक केलं आहे.

यावेळी पंतप्रधानांनी लोंगेवाला पोस्टवर भारतीय जवानांनी १९७१ मध्ये दाखवलेल्या अतुनलीय शौर्याच्या आठवणींना उजाळा दिला. ‘त्यावेळी पश्चिम पाकिस्तान (आताचा पाकिस्तान) पूर्व पाकिस्तानवर (आताच बांगलादेश) अत्याचार करत होता. आपली कृष्णकृत्यं लपवण्यासाठी, जगाचं लक्ष विचलित करण्यासाठी पाकिस्ताननं भारताच्या सीमेवर आक्रमण केलं. पण त्यांना ते महागात पडलं. लोंगेवालावर भारतीय जवानांनी पराक्रम गाजवला. तो इतिहास, तो पराक्रम, ते शौर्य आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात ताजा आहे,’ अशा शब्दांत मोदींनी जवानांच्या साहसाच्या आठवणी जागवल्या.

यावेळी पंतप्रधानांसोबत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत, लष्कर प्रमुख नरवणे, हवाईदल प्रमुख चीफ मार्शल आरकेएस भदौरिया आणि बीएसएफचे डीजी राकेश अस्थाना उपस्थित होते. ‘जवान असतील तर सण आणि उत्सव आहेत. जवानांशिवाय माझं दिवाळी साजरी करणं अपूर्ण आहे,’ असं मोदी यावेळी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांवेळी १९७१ मध्ये पाकिस्तानसोबत लोंगेवाला येथे झालेल्या ऐतिहासिक युद्धाचीही आठवण काढली. ‘भारताच्या जवानांनी इतिहास लिहिला आहे. भारतीय सैन्यासमोर कोणतीही ताकद टिकाव धरू शकणार नाही हे या युद्धानं दाखवून दिलं आहे,’ असंही मोदी यावेळी म्हणाले.

‘लोंगेवाला येथील युद्धाला ५० वर्ष पूर्ण होणार आहेत. संपूर्ण देश शूरवीरांच्या गाथा ऐकून अभिमान व्यक्त करेल. आपल्या शूरवीरांचा भारतमातेलाही अभिमान आहे,’ असं म्हणत मोदींनी देशसेवेत असलेल्या जवानांना नमन केलं.

‘भारत समजून घेणं आणि समजावण्यावर विश्वास ठेवतो. भारताची रणनीती एकदम स्पष्ट आहे. परंतु आम्हाला आजमावण्याचा प्रयत्न केला तर त्यांना त्याचं उत्तरही तेवढंच मोठं मिळतं,’ असं मोदी म्हणाले. यावेळी पंतप्रधानांनी देशाच्या सैन्यासाठी उत्पादन करण्यास पुढे येण्याचं आवाहनही केलं. संकक्षण क्षेत्र आत्मनिर्भर करण्याची प्रक्रिया जलद करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

जवान आहेत तर देश आहे

मोदी म्हणाले, ‘दिवाळीनिमित्त सर्व सैन्य दलांना माझ्या दिवाळीच्या शुभेच्छा. आपण आहात तर देश आहे, देशातील लोकांचा आनंद आहे. मी आज आपल्याकडे सर्व भारतांच्या शुभेच्छा आणि प्रेम घेऊन आलो आहे. प्रत्येक ज्येष्ठ व्यक्तीचा आशीर्वाद मी आपल्यासाठी घेऊन आलोय. तुमच्यासाठी मी मिठाईपण घेऊन आलोय. या मिठाईमध्ये सर्व देशवासीयांचं प्रेम आणि आपलेपणाचं स्वाद आहे. या मिठाईत देशाच्या प्रत्येक आईच्या हाताची गोडी अनभवू शकता.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *