महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १९ नोव्हेंबर – कोरोनामुळे ठप्प झालेले क्रिकेट विश्व हळूहळू पूर्वपदावर येत आहे. आयपीएलच्या यशस्वी आयोजनानंतर भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रलियाचा दौरा करणार आहे. त्यानंतर भारतीय संघ २०२१ च्या ऑगस्ट महिन्यात इंग्लंडचाही दौरा करणार आहे. याबाबतची घोषणा इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने बुधवारी केली. इंग्लंड या दौऱ्यात पाच कसोटी सामन्यांचे आयोजन करणार आहे. दौऱ्यातील पहिला सामना ४ ऑगस्टला होणार आहे. तर कसोटी मालिकेची सांगता १४ सप्टेंबरला होणार आहे.
इसीबीने आपल्या अधिकृत वक्तव्यात ‘यंदाच्या उन्हाळ्यात भारताविरुद्धची कसोटी मालिका होणार आहे. यात ट्रेंट ब्रीज, लॉर्ड्स, हेडिंग्ले, ओव्हल आणि ओल्ड ट्रॅफोर्ड कसोटीचा समावेश असेल.’ दौऱ्याबद्दल माहिती दिली. इसीबीने बुधवारी पुरुष, महिला आणि दिव्यांगासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय मालिकांचा कार्यक्रम जाहीर केला. याचबरोबर इंग्लंड क्रिकेट टीम श्रीलंकेविरुद्ध ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका तर पाकिस्तान विरुद्ध ३ एकदिवसीय आणि ३ टी – २० सामन्यांची मालिका खेळणार आहे.
याचबरोबर इंग्लंड यंदाची अॅशेस मालिकाही आयोजित करणार आहे. पण या मालिकेच्या तारीख अजून निश्चित झालेली नाही. इसीबीचे सीईओ टॉम हॅरिसन यांनी आपल्या अधिकृत वक्तव्यात ‘आमचा गेला आंतरराष्ट्रीय क्रिकेट हंगाम चांगला झाला होता. आम्ही घरात बसलेल्या प्रेक्षकांसाठी चांगल्या मनोरांजनाची सोय केली होती. पुढच्या वर्षी आम्ही अजून मोठा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम आखला आहे. यात भारताबरोबरच्या पाच कसोटी सामन्यांचा थरार असणार आहे. याचबरोबर पुरुष आणि महिला संघासाठी काही एकदिवसीय मालिकांचेही आयोजन केले आहे. जोडीला अॅशेस मालिका आहेच.’ असे सांगितले.