‘महाआवास अभियान’ ग्रामीण बेघरांसाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २१ नोव्हेंबर – ग्रामीण गृहनिर्माणला चालना देण्यासाठी ग्रामविकास विभागामार्फत पुढील शंभर दिवसात राबविण्यात येणाऱ्या महाआवास अभियानाचा (Maha Awas Abhiyan) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. या अभियानाद्वारे ग्रामीण भागात सुमारे ८.८२ लाख घरकुलांची निर्मिती करण्याचा निर्धार करण्यात आला असून सर्वांनी एकत्रित सहभागातून अभियान यशस्वी करावे, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी केले.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे राज्यस्तरीय कार्यशाळेत या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते राज्य व्यवस्थापन कक्ष (ग्रामीण) गृहनिर्माण कार्यालयाचा लोगो, अभियानाचे माहितीपत्रक, मार्गदर्शक पुस्तिका, अभियानाचे भित्तीपत्रक आदींचे प्रकाशन करण्यात आले. राज्यात २० नोव्हेंबर पासून २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत महाआवास अभियान – ग्रामीण राबविले जाणार आहे. याअंतर्गत विविध घरकुल योजनांमधून ८ लाख ८२ हजार १३५ घरकुले बांधण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

घरकुले बांधताना ती पक्की आणि मजबूत बांधली जातील याबाबत सर्वांनी दक्षता घ्यावी. इतर राज्यातील लोकांनी येऊन आपली घरकुले बघितली पाहिजेत, अशा प्रकारच्या आदर्श आणि सुंदर घरांची निर्मिती करण्यात यावी. महाआवास योजनेची आखणी चांगल्या प्रकारे करण्यात आली आहे. फक्त अनुदान देऊन न थांबता त्याबरोबर शौचालय, जागा नसल्यास घरकुलासाठी जमीन, बँकेचे कर्ज असे संपूर्ण पॅकेज लाभार्थ्यास देण्यात येत आहे. ही योजना निश्चितच यशस्वी ठरेल. ग्रामीण घरकुल योजनांसाठी कोणत्याही प्रकारे निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *