महात्मा गांधींच्या पणतूचे दक्षिण आफ्रिकेत कोरोनामुळे निधन

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २४ नोव्हेंबर – महात्मा गांधी यांचे पणतू सतीश धुपेलिया यांचे कोरोनाच्या संसर्गाने निधन झाले आहे. अवघ्या तीन दिवसांपूर्वी त्यांनी आपला ६६ वा वाढदिवस साजरा केला होता. रुग्णालयात न्युमोनियावर उपचार सुरू असताना त्यांना कोरोनाची बाधा झाली होती, अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे.

धुपेलिया यांची बहीण उमा धुपेलिया-मेस्तरी यांनी सोशल मीडियावर ही बातमी दिली. मागील एक महिन्यांपासून सतीश धुपेलिया यांच्यावर रुग्णालयात न्यूमोनियाच्या आजारावर उपचार सुरू होते. या दरम्यानच त्यांना कोरोनाची बाधा झाली. कोरोनाच्या संसर्गामुळे त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती त्यांनी दिली. सतिश धुपेलिया यांची आणखी एक बहीण कीर्ती मेनन या जोहान्सबर्गमध्ये वास्तव्यास आहेत. महात्मा गांधी यांच्या स्मरणार्थ सुरू असलेल्या विविध प्रकल्प, कार्यक्रमांची जबाबदारी त्या पार पाडतात. महात्मा गांधी यांचे चिरंजीव मणिलाल गांधी यांचे ते वंशज आहेत. आपले काम सुरू ठेवण्यासाठी मणिलाल गांधी यांना महात्मा गांधी यांनी दक्षिण आफ्रिकेत ठेवले होते.

महात्मा गांधी यांचे पणतू सतीश धुपेलिया हे मीडियात कार्यरत होते. व्हिडिओग्राफर आणि फोटोग्राफर म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केले. दरबानजवळील गांधी विकास ट्रस्टच्या कामकाजात ते सक्रिय होते. त्याशिवाय आपल्या सेवाभावी वृत्तीमुळे ते दक्षिण आफ्रिकेतील सर्वच समाजघटकात लोकप्रिय होते. त्याशिवाय धुलेपिया अनेक सामाजिक संघटनांमध्येही सक्रिय होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *