मुंबई ; डिसेंबरमध्ये सामान्यांसाठी लोकल, शाळा सुरु करण्याचे संकेत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २६ नोव्हेंबर – थंडी आणि दिवाळीच्या तिसऱ्या आठवड्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. हे रुग्ण न वाढल्यास मुंबईत सामान्यांसाठी लोकल आणि शाळा सुरु करण्याचे संकेत महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.

महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी सांगितले की, सध्या दररोजची रुग्णसंख्या ९०० ते १०००पर्यंत असून, विविध रुग्णालयांत सुमारे ९६०० रुग्ण उपचार घेत आहेत. दिवाळीनंतर रुग्णवाढीचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला असल्याने प्रशासनाने तातडीने उपाययोजना वाढवल्या. त्यामुळे संसर्गाचा वेग रोखता आला आहे. नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून सुरक्षित अंतर, मास्क लावावा. आवश्यक नसेल तर घराबाहेर पडू नये. ही काळजी घेतली नाही, तर संसर्ग पुन्हा वाढण्याची भीती आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाउन टाळणे हे पूर्णपणे आपल्या हाती आहे, असे ते म्हणाले.

पुन्हा रुग्णवाढ झाली तरी पालिकेची आरोग्य यंत्रणा तोंड देण्यास सज्ज आहे. साडेबारा हजार खाटा सध्या रिक्त आहेत. त्यात आयसीयूच्या एक हजार खाटा उपलब्ध आहेत. जम्बो सुविधा असलेली नऊ करोना केंद्रे व रुग्णालये अद्याप बंद केलेली नाहीत. आवश्यकता वाटेल तेव्हा ही केंद्रे पुन्हा सुरू करता येतील. खबरदारी म्हणून बुधवारपासून विमानतळ, रेल्वे स्थानके यासह जिथून बाहेरगावावरून येणारे प्रवासी यांची करोना चाचणी अहवाल किंवा नवीन चाचणी सक्तीची केली आहे. त्याचा नक्कीच सकारात्मक परिणाम दिसू लागेल. बुधवारी सर्व ठिकाणी सुरू केलेल्या तपासणीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *