मुंबई 26/11: मृत्यू जवळून पाहिला की जगण्यातलं भयही निघून जातं : विश्वास नांगरे पाटील

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २६ नोव्हेंबर – २६/११ ची ती काळरात्र आजही अंगाचा थरकाप उडवते… त्या घटनेला तब्बल एक तप पूर्ण होऊनही आजही तो प्रसंग जसाच्या तसा डोळ्यासमोर उभा राहतो.. ती जीवघेणी धावपळ..रक्ताचे थारोळे…डोळ्यांसमोर पावलोपावली मृत्यू दिसत होता… पण तेव्हा एकच लक्ष्य समोर होते… ते म्हणजे अतिरेक्यांनी ओलीस धरलेल्या निरपराध देशी-विदेशी बांधवांची सहीसलामत सुटका करायची. जो दिसेल त्याच्यावर गोळीबार करत अतिशय नियोजनबद्ध हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांना कंठस्नान घालायचं..तास-दोन तास नव्हे, तर तब्बल आठ तास त्या अतिरेक्यांशी लढतानाचा पूर्ण प्रसंगच वाचा तत्कालीन साऊथ झोन पोलिस उपायुक्त व सध्याचे मुंबई सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था प्रमुख) विश्वास नांगरे पाटील यांच्याच शब्दांत…

त्या रात्री ९ वाजून ४० मिनिटांनी नियंत्रण कक्ष बिनतारी संदेश यंत्रणेद्वारे हॉटेल ताजमध्ये अतिरेकी घुसल्याचा संदेश प्राप्त झाला अन् क्षणाचाही विचार न करता आम्ही त्या दिशेने निघालो. अकराव्या मिनिटाला चार कर्मचाऱ्यांसोबत हॉटेलच्या चौथ्या मजल्यावर मी पोहोचलो. काही कळण्यापूर्वीच सोबतचा कर्मचारी अमित खेतले याला दोन गोळ्या लागल्या व तो धारातीर्थी पडला. हल्लेखोर एकाच मजल्यावर असल्याचे लक्षात घेऊन तातडीने व्यूहरचना आखली. दुसऱ्या मजल्यावर १३ व्या मिनिटाला अतिरेक्यांशी धुमश्चक्री झाली. माझ्या पिस्तुलातील ४ फैरींना विरुद्ध बाजूने एके-४७ च्या ३० फैरींनी प्रत्युत्तर मिळाले. त्या वेळी ताजच आपली समाधी असेल की काय अशी शंका मनाला चाटून गेली. पण समयसूचकता प्रसंगावधान राखून चढाई केली.

सहावा मजला गाठला विसाव्या मिनिटाला. आम्ही केलेल्या अनपेक्षित गोळीबारामुळे जवळजवळ एका तासात अतिरेक्यांनी एकही गोळी झाडली नाही. त्यांना युद्ध जास्त काळ चालवायचं होतं, जगाचं लक्ष वेधायचं होतं. बऱ्याच वेळच्या शांततेत नंतर अचानक दोन ग्रेनेड ब्लास्ट झाले. त्या वेळी अतिरेकी उत्तर बाजूच्या सहाव्या मजल्यावर गेले होते. आतमध्ये मृत्यूचे तांडव सुरू झाले होते…त्या स्थितीत आपल्या आयुष्यात देशासाठी मारायची किंवा मरायची पुन्हा एवढी मोठी संधी येणार नाही याची जाणीव माझ्या छोट्या टीमला करून दिली. पुन्हा लिफ्ट पकडली अन् सहावा मजला गाठला. मृत्यूला हुलकावणी देत आगेकूच करत होतो. शेवटी सीसीटीव्ही रूममध्ये पोहोचलो. तिथून त्यांची पोझिशन कळाली. त्यांनी पाच निरपराध नागरिकांना बंदी बनवले होते. या परिस्थितीची नेमकी माहिती वायरलेसवरून तत्कालीन पोलिस आयुक्तांना दिली. त्यांच्याकडून जोपर्यंत नेव्हीचे कमांडो पोहोचत नाहीत तोपर्यंत अतिरेक्यांना तिथेच रोखून धरण्याचे आदेश आले.

दरम्यानच्या काळात अतिरेक्यांनी आमची जागा हेरून आमच्यावर ग्रेनेड हल्ले केले. लाकडी मजला पेटला. येथे जळून मरण्यापेक्षा बाहेर जाऊन लढून मरू, असा मी निर्णय घेतला आणि आम्ही ‘लाइन फॉर्मेशन’मध्ये बाहेर पडलो. अचानक झालेल्या गोळीबाराने आमची टीम तुटली. सोबतचे अधिकारी राजवर्धन यांच्यासोबत पुढेपर्यंत पोहोचू शकलो. सहकारी अमितला तीन गोळ्या लागल्या. राहुलच्या छातीत गोळ्या गेल्याने तो धारातीर्थी पडला होता. पण ज्या वेळी देशासाठी लढताना मृत्यू साद घालतो त्या वेळी एक स्वर्गीय कारण त्या मृत्यूला जवळ करण्यासाठी नेहमी प्रेरणा देत राहते. आमच्या उरात धग होती ती महाराष्ट्र पोलिस दलाचे प्रशिक्षण, शौर्य आणि त्यागभावनेची. त्या बळावर आम्ही तब्बल सहा तास किल्ला लढवला. मग सुदैवाने नेवल कमांडर व त्यांचे साथीदारही मोर्चा सांभाळत साथीला आले. अखेर अतिरेक्यांचा खात्मा झाला…. त्या काळरात्रीला आज बारा वर्षे उलटून गेली असली तरी ती रात्र आठवताना मन अधिकच अस्वस्थ होऊन जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *