महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २६ नोव्हेंबर – भारताचा माजी कर्णधार आणि यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीची संघातील जागा कुणीही घेऊ शकत नाही. त्याची कायम उणीव भासेल, असे सलामीवीर आणि यष्टिरक्षक लोकेश राहुलने एका मुलाखतीत सांगितले.
‘धोनीच्या जागी संघात येणा-या क्रिकेटपटूकडून अपेक्षा असणार यात वादच नाही. केवळ त्या एकाच नव्हे तर मैदानावरील ११ आणि संघातील एकूण १५ क्रिकेटपटूंकडूनही सर्वोत्तम कामगिरी अपेक्षा असणार हे नक्की. संघात धोनीची जागा घेणे, हा विचार माझे चित्त विचलित करत नाही. एक मात्र नक्की की, धोनीची संघातील जागा ही कोणीही घेऊच शकणार नाही. हे माझे प्रामाणिक मत आहे’, असे राहुल म्हणाला. धोनीच्या निवृत्तीनंतर वनडे आणि टी-ट्वेन्टी संघामध्ये स्थान मिळवण्यासाठी राहुल आणि रिषभ पंत यांच्यात चुरस आहे. सध्या तरी लोकेश राहुलला अधिक पसंती आहे.
कायम सर्वोत्कृष्ट कामगिरीला प्राधान्य
देशाचे किंवा एखाद्या क्लबचे प्रतिनिधित्व करताना जास्तीत जास्त सामने जिंकण्याचा आमचा प्रयत्न असतो. संघात जी भूमिका पार पाडण्यास सांगितले जाईल, ते मला मान्य असेल. एखादी भूमिका पार पाडण्याचे सामर्थ्य असेल म्हणून मला ते काम देण्यात येते आणि त्याचा मला अभिमान असेल. त्यामुळे ती भूमिका बजावताना मी द्विधा मनस्थितीत नसतो. माझ्या मनात संघातील भूमिकेबाबत स्पष्टता आहे. प्रत्येक सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करण्याला माझे प्राधान्य असते,’ असेही राहुलने सांगितले.
