महाराष्ट्र 24 । नवी दिल्ली । विशेष प्रतिनिधी ।
करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करणाऱ्या ब्रिटनने फायजरच्या लशीला मंजुरी दिली आहे. फायजरची करोना लस ९५ टक्के प्रभावी असल्याचे चाचणीत समोर आले होते. आता पुढील आठवड्यापासून लस उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे. योग्य चाचणी केल्यानंतर लशीला मंजुरी देणारा ब्रिटन हा पहिला देश असल्याचे आरोग्य मंत्री मॅट हँकॉक यांनी म्हटले.
फायजरने विकसित केलेली करोना लस ९० टक्क्यांहून अधिक प्रभावी असल्याचे समोर आले आहे. फायजर कंपनी ही करोना प्रतिबंधक लस जर्मन कंपनी बायोएनटेकसोबत संयुक्तरीत्या विकसित केली आहे. ही करोनाच्या विषाणूंचा खात्मा करणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. फायजरच्या लस चाचणीचा संपूर्ण डेटा येत्या काही दिवसांत उपलब्ध होण्याची शक्यता आहे. ही लस एका वर्षासाठी सुरक्षा देणार असून वर्षभरानंतर पुन्हा एकदा लस घ्यावी लागणार असल्याचे म्हटले जाते.
येत्या काही दिवसात ब्रिटनमध्ये १० दशलक्ष लस उपलब्ध होणार असल्याचे वृत्त बीबीसीने दिले आहे. ही लस शरीरात प्रोटीन निर्माण करते, त्यातून प्रोटेटिव्ह अॅण्टीबॉडी तयार होते. त्यामुळेच डीप-फ्रीज उत्पादन, स्टोरेज आणि ट्रान्सपोर्टेशन नेटवर्कची अधिक आवश्यकता आहे. जेणेकरून लस अधिक वेळ टिकू शकते. लस वितरणातील अडचणींवर मात करणार असल्याचे हँकॉक यांनी सांगितले.