महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ४ डिसेंबर -औरंगाबाद पदवीधर निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी विजयाची हॅटट्रिक साधली आहे. भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांचा दारुण पराभव करत सतीश चव्हाण यांनी सलग तिसऱ्यांदा निवडून येण्याचा बहुमान मिळवला आहे.
सतीश चव्हाण यांना 1 लाख 18 हजार 638 मते मिळाली तर शिरीष बोराळकर यांना 58 हजार 743 मते मिळाली. एकूण वैध मते 2 लाख 18 हजार 816 तर 23092 मते बाद ठरली. सतीश चव्हाण यांनी विजय मिळवताच आघाडी घेताच काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केलं. मतमोजणीच्या आणखी दोन फेऱ्या शुक्रवारी पहाटेपर्यंत सुरू होत्या.
दरम्यान, विधान परिषदेच्या 6 जागांसाठी झालेल्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा पहिला निकाल आला. भाजपचे अमरीश पटेल यांनी दणदणीत विजय मिळवला. मात्र, उर्वरित पाचपैकी 4 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहेत.