महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ४ डिसेंबर – कोरोनाचा संसर्ग व त्यामळे लागलेल्या लॉकडाउनमुळे गेले सुमारे नऊ महिने बंद असलेल्या व्यावसायिक नाटकांचा पडदा पुढच्या शनिवारी (ता. १२) उघडणार आहे. ही माहिती अभिनेते प्रशांत दामले यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली असून, प्रेक्षकांनी सर्व काळजी घेत नाटकाला येऊन सहकार्य करावे असे आवाहन केले आहे. प्रशांत पाठोपाठ भरत जाधवही ‘सही रे सही’ या नाटकाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
‘प्रेक्षागृहात येऊन नाटक पाहण्याची प्रेक्षकांची भूक गेले नऊ महिने पूर्ण होऊ शकलेली नाही. कोणीतरी पुढाकार घेऊन नाटकाचा पडदा पुन्हा उघडण्याची गरज होती. मी सर्व संबंधित नाट्यगृहांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली व त्यातून नाट्यगृहे उघडण्याचा निर्णय झाला. पुणे महापालिकेने आम्हाला खूप चांगले सहकार्य केले. बालगंधर्व, यशवंतराव चव्हाण ही नाट्यगृहे चकाचक झाली आहेत. आता प्रेक्षकांनी आम्हाला साथ देऊन नाटकांना पुन्हा जोरदार प्रतिसाद द्यावा. नाटके पुन्हा सुरू झाल्याने नाटकांवर अवलंबून अनेकांचा संसार पुन्हा सुरळीत सुरू होऊ शकणार आहे. ही सुरुवात झाल्यानंतर त्यात पुन्हा खंड पडू नये यासाठी आम्हाला अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे,’’ असे दामले यांनी स्पष्ट केले.
नाटक सादर करण्याच्या पद्धतीत किंवा खर्चात काही बदल होणार का या प्रश्नावर ते म्हणाले, ‘‘आम्ही नाटक पूर्ण संचाद्वारे सादर करणार आहोत. मी मुख्य कलाकारांना मानधन काही प्रमाणात कमी घ्यावे, अशी विनंती केली आहे. त्याचबरोबर बस व टेम्पोचा खर्च कमी करण्यासाठी वाहतुकदारांशी बोलणी केली आहे. प्रेक्षागृहात निम्म्याच प्रेक्षकांना प्रवेश असल्याने प्रयोग तोट्यात जाऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. प्रेक्षकांनी मास्क, सॅनिटायझर व सोशल डिन्स्टंन्सिगसंदर्भातील सर्व नियम काटेकोरपणे पाळत नाटक पाहायला यावे, अशी माझी विनंती आहे.’
पुणे व पिंपरीतील प्रयोगांची ऑफलाइन तिकिट विक्री स्वतः प्रशांत दामले व कविता लाड रविवारी (ता. ६) प्रेक्षागृहावर करणार आहेत. यासंदर्भात कविता म्हणाल्या, ‘प्रेक्षक आम्हाला भेटण्यास उत्सुक आहेत, त्याप्रमाणे आम्हीही त्यांना भेटण्यास उत्सुक आहोत. ‘न्यू नॉर्मल’ कसे असेल याबद्दल मोठी उत्सुकता आहे. आम्ही प्रेक्षक व स्वतःची काळजी घेऊन पुन्हा नाटक सुरू करीत आहोत.’