महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ५ डिसेंबर – दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूला कोरोनाची लागण झाल्यामुळे इंग्लंडविरुद्धची पुढची वनडे पुढे ढकलण्यात आली आहे. मॅच सुरू होण्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे ही वनडे पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या टी-20 आधीही दक्षिण आफ्रिकेच्या काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती, पण त्यांना विलगिकरणात ठेवून टी-20 सीरिज खेळवण्यात आली होती. या सीरिजमध्ये इंग्लंडचा विजय झाला होता.
टॉसआधीच खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातली वनडे सीरिज रविवार 6 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. वनडे सीरिजआधी गुरुवारी खेळाडूंची कोरोना टेस्ट करण्यात आली, यामध्ये दक्षिण आफ्रिकेच्या टीमच्या एका खेळाडूची टेस्ट पॉझिटव्ह आली आहे. दोन्ही टीमच्या सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही वनडे सीरिज पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे, असं दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या सहमतीने हा निर्णय झाल्याचंही दक्षिण आफ्रिका बोर्डाने स्पष्ट केलं आहे.
टी-20 सीरिजआधीही दक्षिण आफ्रिकेच्या दोन खेळाडूंना कोरोना झाला होता, त्यामुळे खेळाडूंच्या संपर्कात आलेल्या आणखी दोन खेळाडूंना क्वारंटाईन करण्यात आलं होतं. डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातल्या गोपनियतेमुळे खेळाडूंच्या नावाची घोषणा आम्ही करणार नसल्याचं क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने सांगितलं होतं.
यापूर्वी आतापर्यंत पाकिस्तानचे 7 खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. पाकिस्तानी खेळाडू कोरोना पसरवू शकतात, अशी भीती न्यूझीलंडच्या आरोग्य विभागाला आहे. पाकिस्तानची टीम मागच्या 10 दिवसांपासून क्वारंटाईन आहे. एकाच वेळी त्यांचे 6 खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. यानंतर आणखी एका खेळाडूला कोरोना झाल्याचं समजलं.