सर्वसामान्यांकरिता लोकल नव्या वर्षातच सुरू होणार !

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ११ डिसेंबर – लोकल प्रवासाच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्वसामान्य मुंबईकरांना जानेवारीची वाट पाहावी लागणार आहे. कोरोना संसर्गाचा धोका अद्याप टळलेला नाही. काहीच दिवसांत नाताळ व नवीन वर्षाची धामधूम सुरू होईल. या कालावधीत गर्दी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्यांकरिता लोकल नव्या वर्षातच सुरू करण्यात येईल, अशी माहिती पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

मुंबईत सणासुदीच्या काळानंतर कोरोना रुग्ण संख्या वाढण्याची शक्यता होती. पालिकेने राबवलेल्या उपाययोजनांमुळे कोरोना नियंत्रणात आला आहे. सध्या 700 ते 800 पर्यंत रुग्ण आढळून येत आहेत. ही स्थिती समाधानकारक असली तरी कोरोनाचा धोका अजून कायम आहे. अशाच स्थितीत नाईट क्लबप्रमाणे नियम धाब्यावर बसवून शेकडो लोक विनामास्क एकत्र गर्दी करणार असतील तर दुसरी लाट येण्यास विलंब होणार नाही. येत्या काही दिवसांनंतर ख्रिसमस व नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर लोकांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे. थर्टीफर्स्टला लोक सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. कोरोना रुग्णांची संख्या यामुळे वाढू नये यासाठी पालिकेने खबरदारी घेतली आहे. त्यामुळे सध्या तरी लोकल सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे आयुक्त इक्बाल चहल यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांना आता नव्या वर्षात लोकलचे दरवाजे खुले होणार आहेत. लोकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही आयुक्तांनी केले आहे.

रुग्णवाढ पाच टक्केवर

विविध उपाययोजना राबवून पालिकेने कोरोना नियंत्रणात आणला. मे – जूनमध्ये 100 चाचण्या केल्या तर 38 टक्के रुग्ण आढळून येत होते. 4 डिसेंबरला हे प्रमाण 5 टक्केवर आले आहे. 7 डिसेंबरपर्यंत 4 टक्के त्यानंतर 8, 9 व 10 डिसेंबरपर्यंत हे प्रमाण 5 टक्केवर असून जवळपास आठवडाभर कायम राहिले आहे. सौम्य व कोणतीही लक्षणे नसलेले 742 रुग्ण आढळले आहेत. तर प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णांची संख्या 120 आहे. पालिकेच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

विनामास्क कारवाई तीव्र

मुंबईकरांच्या सहकार्यामुळे कोरोना नियंत्रणात ठेवणे शक्य झाले आहे. मात्र अजूनही लस आलेली नसल्याने सोशल डिस्टनसिंग व मास्कचा वापर करणे आवश्यक झाले आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावता फिरल्यास कारवाई करण्यात येत आहे. ही कारवाई अधिक तीव्र करणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *