महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ११ डिसेंबर -पश्चिम विक्षोभामुळे पर्वतीय भागातील हवामान झपाट्याने बदलू लागले आहे. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड व लडाखमध्ये बर्फवृष्टी होत आहे. या बदलामुळे देशाच्या वेगवेगळ्या भागात एकाच वेळी थंडीचा कडाका, उष्णता, बर्फवृष्टी व बेमोसमी पावसाचा अनुभव येत आहे. पाकिस्तानकडून शुक्रवारी आणखी एक पश्चिमी विक्षोभ येणार आहे. त्यामुळे हिमालयाकडून थंड वारे वाहू लागले आहेत. मैदानी भागातील तापमानात घट होईल. डोंगराळ भागात दोन दिवस बर्फवृष्टी सुरू राहील.
हरियाणावर एक वादळी वर्तुळाकार तयार झाला आहे. परिणामी पुढील दोन ते तीन दिवस पंजाब, हरियाणापासून दिल्लीपर्यंत वेगवेगळ्या भागात पावसाची हजेरी राहील. दिल्लीत गुरुवारी कमाल तापमान सरासरी ५ अंश सेल्सियसपेक्षा जास्त नोंदवण्यात आले आहे. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंडपासून पश्चिम बंगालपर्यंत दाट धुके आहे.
कोटा : विक्रम माेडला
राजस्थानच्या कोटा येथे डिसेंबरमध्ये ९ वर्षांचा विक्रम मोडला आहे. बुधवारी तापमान ३२.५ अंश सेल्सियस नोंदवण्यात आले. मध्य प्रदेशातील अनेक शहरांत तापमानात वाढ झाली. त्यामागे बंगालच्या खाडीत तयार झालेला कमी दाबाचा पट्टा कारणीभूत असल्याचे तज्ञांना वाटते.