15 शेतकरी संघटनांचा नव्या कायद्यास पाठिंबा ; केंद्राचा दावा तर शेतकरी म्हणाले – रातोरात संघटना उभ्या, नावेही ऐकली नाहीत ;

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १५ डिसेंबर – : नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. सोमवारी अनेक राज्यांतील शेतकऱ्यांनी उपोषण केले. दुसरीकडे, चर्चेची दारे खुली आहेत, पण कायदे मागे घेणार नाही, असा स्पष्ट पुनरुच्चार केंद्र सरकारने केला. तिकडे, शेतकरीही कायदे मागे घेण्याच्या मागणीवर ठाम आहेत. यूपी, बिहारसह इतर राज्यांतील १५ पेक्षा जास्त संघटनांनी कायद्यांचे समर्थन केले आहे, असा सरकारचा दावा आहे. पण संयुक्त किसान मोर्चाचे सदस्य शिवकुमार कक्का म्हणाले की, सरकार संभ्रम निर्माण करत आहे, अनेक संघटना रात्रीतून उभ्या केल्या जात आहेत. अनेक संघटनांची नावेही ऐकली नाहीत. सोमवारी जे लोक कृषिमंत्र्यांना भेटले, ते अखिल भारतीय शेतकरी समन्वय समितीचे आहेत. दिल्ली आणि इतर राज्यांत संयुक्त मोर्चाच्या बॅनरखाली आंदोलन सुरू असून ते आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. संरक्षणमंत्री राजनाथसिंह म्हणाले की, कायदे शेतकरी हिताचे आहेत, ते मागे घेतले जाणार नाहीत. कृृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर म्हणाले की, खरे शेतकरी नेते पुढे आले तरच तोडगा निघू शकेल.

शेतकऱ्यांना पाठिंबा देत मुलांनी सोपवला गल्ला
– गाझीपूर बॉर्डरवर मीरतच्या चार मुलांनी शेतकऱ्यांना पाठिंबा दिला. ७ ते १३ वर्षांदरम्यान वय असलेल्या या मुलांनी गेल्या ४-५ महिन्यांत आपल्या गल्ल्यामध्ये साठवलेले पैसे शेतकऱ्यांना दिले.
– एनएच-२४ वर काही आंदोलक धरणे देत होते. शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी आंदोलकांना हायवे मोकळा करण्याची विनंती केली. आंदोलकांनी ती मान्य केली.
– कुंडली बॉर्डरवर निदर्शनांत पंजाबच्या मोगाचे शेतकरी मक्खन खान (४२) यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. गेल्या १९ दिवसांत आंदोलनस्थळी १५ हून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *