महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १७ डिसेंबर – लॉकडाऊनमध्ये वाहनांपासून प्रदूषण घटले, मात्र वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन क्लासेस तसेच काम आणि अभ्यासासह करमणुकीसाठी इंटरनेटचा वापर वाढल्याने देशभरात सुमारे १३ टक्के अधिक कार्बन उत्सर्जन झाले. इंटरनेट वापरण्यासाठी लागणाऱ्या गॅजेटची निर्मिती, डेटा सेंटर, सर्व्हरला लागणारी वीज आणि एसी यातून मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन होत आहे. भारतीय दूरसंचार नियामक आयोग म्हणजेच ट्रायच्या अहवालानुसार भारतात मार्च ते ऑगस्टदरम्यान इंटरनेटचा वापर ८ ते १३ टक्क्यापर्यंत वाढला व त्यामुळे कार्बन उत्सर्जन वाढले. देशात इंटरनेटचा वापर सर्वाधिक १२ टक्के एकट्या महाराष्ट्रात वाढला. देशाचा विचार करता पूर्वीच्या सरासरी ५.५ तासांऐवजी स्मार्टफोनचा वापर या काळात ७ तास झाला.
दि ग्लोबल डिजिटल इमिशन स्टडीजनुसार ३० मिनीटे नेटफ्लिक्स बघितल्याने १.६ किलो, एका ई-मेलने ४ ते २० ग्रॅम, एक तास यूट्यूबमुळे ६ ग्रॅम, एक गुगल सर्च ०.२ ग्रॅम, एका ट्वीटमुळे ०.०२ ग्रॅम तर एक टेक्स्ट मेसेज पाठवल्याने ०.०१ ग्रॅम कार्बन उत्सर्जन होते. वेबसाइट बिल्डर एक्स्पर्ट संस्थेच्या माहितीनुसार जगभरात एका मिनिटाला १.१ दशलक्ष तास ऑनलाइन स्ट्रिमिंग होते. यातून मिनिटाला ४,१२०,००० किलो कार्बन उत्सर्जन होते. एका मिनिटात पाठवलेल्या २०३.९ दशलक्ष मेलमुळे ८१५,६६६ किलो, यूट्यूबवर ६९४,००० तास स्ट्रिमिंगमुळे ४१६७ किलो, गुगलवर ३.८ दशलक्ष सर्चमुळे ७६० दशलक्ष, १६ दशलक्ष टेक्स्ट मेसेजमुळे १६० किलो तर मिनिटाला ५११,००० ट्वीटमुळे १० किलो कार्बन उत्सर्जन होते. इंटरनेट कार्बन फूट प्रिंट्स उत्सर्जित करणारा चीन आणि अमेरिकेनंतरचा भारत तिसरा देश आहे.
मोबाइल-लॅपटॉपवर सुरू असणाऱ्या इंटरनेटसोबत जगाच्या कानाकोपऱ्यातील डेटा सेंटरचे कामही सुरू असते. डेटा सेंटरमध्ये वेेबपेजेस, फाइल्स, डेटाबेस, अॅप्लिकेशन्स, डाऊनलोडेबल कंटेट साठवणारे लाखो सर्व्हर असतात. हे सर्व्हर समुद्राखालून गेलेल्या केबल, स्विचेस आणि राऊटर्सने जोडलेले असतात. ही यंत्रणा अविरतपणे सुरू ठेवण्यासाठी वीजपुरवठा आणि एअर कंडिशनरची गरज पडते. इंटरनेटचा वापर वाढल्याने त्याद्वारे कार्बन उत्सर्जन वाढले.
कोडिंग व्हिजन्स इन्फोटेकचे वेदांत जहागीरदार म्हणाले, वेबसाइटवर कमी ग्राफिक्सचा वापर, ड्रॉप डाऊन मेन्यूऐवजी जेपीईजी किंवा जीआयएफ फॉरमॅटचे फोटो, मर्यादित व्हिडिओ, स्थानिक डेटा सेंटरचा उपयोग, कमी डेटा लागणारे कोड्स, रेडिमेड टॅम्पलेट्स टाळणे तसेच डेटा सेंटर सर्व्हरसाठी सौर ऊर्जेचा वापर करून कार्बन उत्सर्जन कमी करता येऊ शकते. मेल, मेसेज पाठवले म्हणजे त्यातून कार्बन उत्सर्जन होत नाही. पण त्यासाठी लागणारी यंत्रणा कार्यान्वित ठेवण्यासाठी वीज, एसीतून हे उत्सर्जन होते. त्यामुळे अपारंपरिक ऊर्जेवर चालणारे डेटा सेंटर आणि इको-फ्रेंडली वेबसाइट काळाची गरज आहे.