महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १७ डिसेंबर – कोविड-१९ च्या जागतिक महामारी संकटानंतर गोव्यातील चौगुले शिपयाडर््स या कंपनीने निर्यात बाजारपेठेत भारतातील पहिल्या वेसल (जहाज) ची यशस्वी निर्यात केल्याची घोषणा केली आहे. ‘लेडी हेडविग’ नावाचे हे जहाज नेदरलँड्सस्थित ‘विजने अॅण्ड बॅरंड्स’ या ग्राहकांसाठी रवाना करण्यात आले आहे. कोविडच्या संकटानंतर हे यश गाठणारे आम्ही देशात पहिलेच असल्याचा आनंद असल्याचे चौगुले अॅण्ड कंपनीचे कार्यकारी संचालक अर्जुन चौगुले म्हणाले.
या वेसलची एकूण लांबी ९८.२ मीटर, रुंदी १३.४ मीटर, खोली ७.८ मीटर आणि ड्राफ्ट ५.६ मीटर एवढा आहे. नेदरलँडमधील ग्राहकांकडून ६ जहाजांची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी हे तिसरे जहाज आहे. सोमवारी या जहाजाने गोव्यातून नेरलँडसाठी प्रवास सुरु केला. कोविडनंतर निर्यात बाजारपेठेत पाठवलेले हे पहिलेच जहाज आहे.
जागतिक संकटातही जहाजाच्या निर्यातीवर परिणाम होणार नाही, यासाठी टीमने प्रचंड मेहनत घेतली आहे. कोविड-१९ मधील नियमांमुळे ओईएम सर्विस इंजिनीअर्स उपलब्ध नसतानाही टीमने साधनांच्या उभारणीवर स्वत:च काम केले. अर्थात, ओईएम्सकडूनही यासाठी मदत करण्यात आली. आंतरराष्ट्रीय शिपबिल्डिंग बाजारपेठेत गांभीर्याने व्यवसाय करणारी कंपनी बनण्यावर आमचा भर असल्याचेही चौगुले म्हणाले.
