आज पंतप्रधान मोदी साधणार शेतकऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १८ डिसेंबर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केलेल्या तीन नव्या शेतकरी कायद्यांविरोधात गेले २३ दिवस दिल्लीच्या वेशीवर आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या समर्थनार्थ विरोधी पक्षांनी एकत्र येत भारत बंद पाळला होता. या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी विरोधी पक्षाचे शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटले. सत्ताधारी पक्षाकडून आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी बैठका घेण्यात आल्या. शेतकरी नेत्यांशी अनेकदा चर्चादेखील करण्यात आली. तरीही हे आंदोलन अद्याप थांबत नसल्याने अखेर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या आंदोलनाकडे लक्ष वळवले आहे. मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांशी पंतप्रधान मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग माध्यमातून संवाद साधणार आहेत.

शेतकरी आंदोलनावरून सध्या देशात संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. सत्ताधारी नेते आणि विरोधक एकमेकांवर आरोप करताना दिसत आहेत. याचदरम्यान पंतप्रधान मोदी यांनीही दोन दिवसांपूर्वी आंदोलनाबाबत मत व्यक्त केले. “विरोधक शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत. त्यांची सत्ता असताना हे नेते या कायद्याचे समर्थन करत होते. पण आता राजकारण करण्यासाठी शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी चालवण्याचा विरोधकांचा डाव आहे”, असे ते आपल्या भाषणात आंदोलनाबाबत बोलताना म्हणाले. केद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी शेतकऱ्यांना ८ पानी खुलं पत्र लिहीत कायद्यांतील आवश्यक ते बदल करण्यासाठी चर्चेला सरकार तयार असल्याचेही म्हटले. तशातच पंतप्रधान मोदी हे शेतकऱ्यांना संबोधित करणार असल्याचे बातमी आंदोलनकर्त्यांना सकारात्मकता देईल अशी भावना व्यक्त होत आहे.

तोमर यांनी लिहिलेल्या पत्रावर बोलताना मोदी म्हणाले की तोमर यांनी पत्रातून शेतकरी नेत्यांना एक विनम्र विनंती केली आहे की तुम्ही तुमच्या समस्या मांडण्यासाठी चर्चा करा. तोमर यांचं पत्र अन्नदात्याने नक्कीच वाचावं, असेही मोदी यांनी आवाहन केलं आहे. तोमर यांनी पत्रात सरकार शेतकऱ्यांच्या भल्यासाठी कार्यरत असल्याचे भ्रमित केलं आहे. तसेच नव्या तीन शेती कायद्यांमुळे भारतातील शेतकऱ्यांचा फायदाच होणार असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *