महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २० डिसेंबर – ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा (India vs Australia) 8 विकेटने दारूण पराभव झाला. दुसऱ्या इनिंगमध्ये भारताचा फक्त 36 रन वर ऑल आऊट झाला. टेस्ट क्रिकेटमधला भारताचा हा निच्चांकी स्कोअर आहे. यानंतर ऑस्ट्रेलियाने त्यांना मिळालेलं 90 रनचं आव्हान 2 विकेट गमावून पूर्ण केलं. दुसऱ्या इनिंगमध्ये जो बर्न्सने नाबाद 51 रन केले, तर वेडने 33 रनची खेळी केली. पण ऑस्ट्रेलियाचा विजयाचा हिरो ठरला जॉश हेजलवूड. त्याने फक्त 8 रन देऊन भारताच्या 5 विकेट घेतल्या.
भारताच्या या लाजीरवाण्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग (Ricky Pointing) याने टीम इंडियाला सल्ला दिला आहे. टीम इंडियाने रोहित शर्मा (Rohit Sharma) याला लवकरात लवकर खेळवावं, असं पाँटिंग चॅनल सेव्हनशी बोलताना म्हणाला. रोहित शर्मा मयंक अगरवाल आणि पृथ्वी शॉ यांच्यापेक्षा चांगला खेळाडू आहे. जर तो फिट असेल, तर त्याला ओपनर म्हणून टीममध्ये घेतलं पाहिजे, असं पाँटिंग म्हणाला.
एनसीएने मंजुरी दिल्यानंतर रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाला पोहोचला आहे. रोहित ऑस्ट्रेलियात तिसरी आणि चौथी मॅच खेळेल, अशी शक्यता आहे. पण त्याआधी रोहितला पुन्हा एकदा फिटनेस टेस्ट द्यावी लागणार आहे. रोहित शर्मा हा सध्या ऑस्ट्रेलियात क्वारंटाईनचा कालावधी घालवत आहे, त्यातही त्याला फिटनेसवर काम करावं लागत आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीमध्ये रोहितची भूमिका आणखी जास्त महत्त्वाची होते. विराटची पत्नी अनुष्का शर्मा बाळाला जन्म देणार असल्यामुळे विराट भारतात परतत आहे.
भारताचे माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांनाही रोहित शेवटच्या दोन टेस्ट मॅच खेळेल, असा विश्वास आहे.