महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २० डिसेंबर – खाद्यपदार्थांमध्ये होत असलेली भेसळ आणि कमी दर्जाच्या पदार्थांच्या विक्रीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने मोहीम अधिक तीव्र केली आहे. खाद्यतेलांच्या भेसळीसंदर्भात लागोपाठ केलेल्या तीन कारवाईंनंतर बुधवारी एफडीएने मुंबईतून तब्बल ३४ लाख किमतीचे भेसळयुक्त मध जप्त केले आहे.
भायखळ्याच्या पूर्वेच्या दादोजी कोंडदेव क्रॉस रोड येथे असलेल्या अंडर द मॅन्गो ट्री नॅचरल अँड ऑरगॅनिक प्रा. लिमिटेड कंपनीमध्ये कमी दर्जाचे मध साठवून ठेवले असल्याची माहिती एफडीएच्या अधिकार्यांना मिळाली होती. त्यानुसार बुधवारी एफडीएच्या अधिकार्यांनी कंपनीवर छापा घातला. या छाप्यामध्ये कमी दर्जाचे मध ड्रममध्ये साठवून ठेवल्याचे सापडले. मध साठवलेल्या ड्रमवर कोणतेही लेबल लावण्यात आले नव्हते. तसेच मधाच्या रिपॅक बॉटल्सवर लेबलदोष आढळून आला. तसेच विक्रीसाठीही पॅक केलेले मध हेसुद्धा कमी दर्जाचे असल्याच्या संशयावरून एफडीएने तब्बल २९८८ किलोग्रॅम वजनाचा मधाचा साठा जप्त केला. जप्त केलेल्या साठ्याची किंमत ही ३४ लाख ५९ हजार १२६ रुपये किमतीचे आहे.
जप्त केलेल्या मधाच्या साठ्यातील नमुने सखोल निरीक्षणासाठी लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. यामध्ये हनी (अकासिया), हनी (युकॅलिक्टस), हनी (युकॅलिक्टस ५०० ग्रॅम, हनी (जामुन) लुज, हनी (जामुन) ५०० ग्रॅम, हनी (मसाला) लुज, हनी (मसाला) ३२५ ग्रॅम, हनी( ऑरगॅनिक सर्टिफाईड) लूज, हनी( ऑरगॅनिक सर्टिफाईड) ५०० ग्रॅम, हनी (टायगर रिजर्व) लुज, हनी (वाईल्ड फॉरेस्ट) लुज, हनी (वाईल्ड फॉरेस्ट) ५०० ग्रॅम यांचा समावेश आहे. एफडीए आयुक्त अभिमन्यू काळे व सहाय्यक आयुक्त प्रि. अ. विशे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी रवींद्र जेकटे यांनी केल्याची माहिती सह आयुक्त (अन्न) शशिकांत केंकरे यांनी दिली.