अमेरिकेत कोरोना रुग्णांचे वाढते आकडे हे धडकी भरवणारे ; एका दिवसात ४ लाख नवे रुग्ण

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २१ डिसेंबर – अमेरिकेत कोरोना संसर्गाने भयानक रुप धारण केले आहे. गेल्या दोन दिवसांपासूनचे अमेरिकेतील कोरोना रुग्णांचे वाढते आकडे हे धडकी भरवणारे आहेत. गेल्या २४ तासांत अमेरिकेत तब्बल ४ लाख नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर २५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

अमेरिकेच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राने (सीडीएस) दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेत गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाचे ४ लाख ३ हजार ३५९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. याआधी ११ डिसेंबर रोजी अमेरिकेत एका दिवसातील आतापर्यंतच्या सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. ११ डिसेंबरला अमेरिकेत २ लाख ४४ हजार ११ नवे रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे आजचा आकडा किती भयंकर आहे हे लक्षात येतं.

गेल्या २४ तासांत मृत्यू झालेल्यांची संख्या २,७५६ इतकी असल्याचं सीडीएसने जाहीर केलं आहे. जगभरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण हे अमेरिकेतच आढळून येत आहेत. आतापर्यंत १.७६ कोटींहून अधिक रुग्णांची अमेरिकेत नोंद झाली आहे. तर ३ लाख १५ हजार ६०० जणांचा मृत्यू झाला आहे.

दुसरीकडे अमेरिकेत कोरोनावरील लस देण्याचं कामही सुरु झालं आहे. पण त्याचवेळी संक्रमणाचंही प्रमाण वाढल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. अमेरिकेतील तुरुंगांमध्ये शिक्षा भोगत असलेल्या एकूण कैद्यांपैकी प्रत्येक ५ कैद्यांमागे एक कैदी कोरोना पॉझिटीव्ह असल्याची आकडेवारीही समोर आली होती. कोरोनाच्या दुस-या लाटेला सामोरं जात असलेल्या अमेरिकेत ४ नोव्हेंबरपासून दररोज १ लाखांपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहेत. कॅलिफोर्निया, टेक्सास आणि फ्लोरिडामध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *