जगभरातील अनेक देशांची भारतीय अर्थव्यवस्थेवर नजर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २१ डिसेंबर – भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये गेल्या काही वर्षात बऱयाच सुधारणा झालेल्या असून आता जगभरातील अनेक देश भारताकडे आशेने पाहत आहेत, असे सुतेवाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी ‘असोचॅम’ (‘एएसएसओसीएचएएम’) संमेलनात केले. अनेक देश भारताकडे आकर्षित होत असल्यामुळे कोरोना काळातही भारतात विक्रमी थेट विदेशी गुंतवणूक (एफडीआय) झाल्याचेही त्यांनी यावेळी प्राधान्याने नमूद केले.

भारतीय उद्योजकांच्या संघटनेच्या वतीने आयोजित परिषदेमध्ये पंतप्रधान मोदींनी शनिवारी मार्गदर्शन केले. भारत आपल्या सामर्थ्याच्या बळावर व संसधानांवर विश्वास करत आत्मनिर्भरतेने पुढे वाटचाल करत आहे. या उद्दिष्टपुर्तीसाठी आमचे नवनिर्मितीकडे विशेष लक्ष आहे. उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी आम्ही सातत्याने सुधारणा करत आहोत, असे मोदी यांनी स्पष्ट केले. तसेच, मागील 100 वर्षांपासून आपण सर्वजण देशाच्या अर्थव्यवस्थेला, कोटय़वधी भारतीयांचे जीवन सुकर बनण्यासाठी कार्यरत आहात. आता आपल्याला नियोजनही करायचे आहे व त्यावर अंमलबजावणी देखील करायची आहे. आपल्याला प्रत्येक वषीच्या प्रत्येक उद्दिष्टास राष्ट्र निर्माणाच्या मोठय़ा उद्दिष्टाशी जोडायचे आहे. आता आगामी काळात आत्मनिर्भर भारतासाठी तुम्हाला संपूर्ण ताकद लावायची आहे. या क्षणी जग चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. नव्या तंत्रज्ञानाच्या रुपात आव्हाने देखील येतील व समाधान देखील असेल, असेही त्यांनी उपस्थितांना सांगितले.

आपले उद्दिष्ट केवळ आत्मनिर्भर भारतच नाही, तर आपण हे उद्दिष्ट किती लवकर साध्य करू शकतो, हे देखील तितकेचे महत्त्वाचे आहे. येणारी 27 वर्षे ही भारताची जागतिक भूमिकाच निश्चित करणार नाही तर ही आपल्या भारतीयांची स्वप्ने व समर्पणाची देखील परीक्षा पाहतील. ही वेळ भारतीय उद्योग जगताच्या रुपाने तुमची क्षमता, बांधिलकी व धैर्य जगाला दाखवून देण्याची आहे, असेही मोदी म्हणाले.

टाटा समूहाचे कौतुक

भारताच्या विकासात टाटा समूहाने दिलेल्या योगदानाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या उद्योग समूहाचे तोंडभरून कौतुक केले आहे. भारतीय उद्योजकांच्या संघटनेने गेल्या शंभर वर्षांच्या काळात अनेक प्रकारचे चढउतार पाहिले. पण या सर्व काळात टाटा समूहाने भारताच्या विकासात मोलाची भरच घातली आहे, असे मोदींनी यावेळी नमूद केले. सत्काराला उत्तर देताना रतन टाटा यांनीही मोदींच्या नेतृत्वाचा गौरव केला. मोदींनी देशहितासाठी त्यांना योग्य वाटले ते निर्णय घेतले आणि पूर्ण करून दाखवले. लॉकडाऊनचा निर्णयही अचूकवेळी घेतल्यामुळे कोरोनास्थिती देशात नियंत्रणात राहिली, असे रतन टाटा म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *