महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २१ डिसेंबर – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी दुपारी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. ‘राज्यात पुन्हा लॉकडाऊनची गरज मला वाटत नाही. पण अजूनही आपण धोक्याच्या वळणावर आहोत हे विसरुन चालणार नाही’, असं मुख्यमंत्री म्हणाले.
‘राज्यात पूर्ण नाही, पण काही प्रमाणात नक्कीच संसर्गाला अटकाव करण्यात यश आलं आहे. सावध राहा हे माझं कुटुंब प्रमुख म्हणून सांगणं काम आहे. आता थंडीचे दिवस आहेत. त्यामुळे थंडीचे आजार वाढ घेत आहेत. त्यामुळे आजारी पडून इलाज करण्यापेक्षा काळजी घेतलेली बरी. पुढील किमान ६ महिने मास्क वापरणं बंधनकारक राहणार आहे’, असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
लग्नसराई, ख्रिसमस आणि नववर्ष स्वागताचा काळ असल्यामुळे गर्दी वाढल्याने कोरोना वाढीची शक्यता असल्याच्या मुद्द्यावरही मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलं. ‘ख्रिसमस, लग्नसराई आणि नववर्ष असल्यानं मास्क काढून सेल्फी काढले जातील, गर्दी वाढेल. पण असं निष्काळजीपणे वागून चालणार नाही. लग्नात आप्तेष्टांना ‘यायचं हं…’ म्हणण्याची पद्धत आहे. पण या लग्नसराईत गर्दीकरुन कोरोनाला ‘यायचं हं…’ म्हणू नका’, असं मुख्यमंत्री म्हणाले.