महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २१ डिसेंबर – नाताळ, सलगच्या शासकीय सुट्या, सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागत या काळात शिर्डीत भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता संस्थान प्रशासनाने रोजची भाविकांची दर्शन मर्यादा सहा हजारांहून आता १२ ते १५ हजार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला .दर्शनासाठी येताना ऑनलाइन पास काढून यावे लागेल. भाविकांनी कोविडच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करणे गरजेचे आहे, असे साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
२५ ते ३१ डिसेंबरदरम्यान शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी होणार असल्याची शक्यता असल्याने वरील निर्णय घेतला आहे. भाविकांनी दर्शनासाठी सशुल्क व मोफत पास अगोदर बुकिंग करूनच यावे. सशुल्क पास पाच दिवस आधी तर मोफत पास दोन दिवस आधी ओळखपत्राच्या आधारे ऑनलाइन मिळेल. स्वतःचे ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. नवीन वर्षानिमित्त भाविकांनी पालख्या घेऊन येऊ नये. ६५ वर्षापुढील तसेच दहा वर्षांच्या आतील मुलांना मंदिरात प्रवेशबंदी आहे.