अकरावी प्रवेशांमधील घोळ आवरा; विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत :आशिष शेलार यांची मुख्यमंत्र्यांना विनंती

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २३ डिसेंबर – यावर्षी कोविडमुळे अकरावी प्रवेशाची प्रक्रिया विलंबाने होत असून यामध्ये प्रचंड घोळ सुरू असल्याच्या तक्रारी येत आहेत. अद्याप 1 लाख विद्यार्थी प्रवेशापासून वंचित असून हा घोळ मिटवा, विद्यार्थी, पालकांना होणारा त्रास थांबवा अशी विनंती करीत भाजपा नेते माजी शिक्षण मंत्री आमदार अँड आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहून याकडे लक्ष वेधले आहे.

या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, दहावीचे निकाल जुनमध्ये जाहीर झाले त्यानंतर आजपर्यंत प्रवेश प्रक्रिया पुर्ण झालेली नाही. यावर्षी निकाल लागल्यानंतर 15 दिवस विलंबाने ही प्रक्रिया सुरू केली गेली. दरवर्षी प्रमाणे दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच ही प्रक्रिया सुरू केली असती तर मराठा समाजातील विद्यार्थ्यांना सुध्दा आरक्षणानुसार प्रवेश मिळून आरक्षणावर स्थगिती येईपर्यंत आपली प्रक्रिया पुर्ण झाली असती. या शासन दिरंगाईचा फटका मराठा समाजातील विद्यार्थ्यांना बसला.

यावर्षी मुळातच उशिराने सुरू झालेली प्रवेश प्रक्रिया पुढील काळातही वेग पकडू शकली नाही आजपर्यंत ही प्रक्रिया वेगाने दोषमुक्त सुरू आहे असे चित्र सध्या राज्यात दिसत नाही. आज अखेर सुमारे 1 लाख विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला नाही. त्यामुळे विद्यार्थी पालक यांच्यामध्ये प्रचंड असंतोष आहे. याबाबत वेळीच शासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

प्रवेश प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी प्राचार्य आणि शिक्षकांची कमिटी गठीत करण्यात यावी. प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शक पुस्तिका देण्यात पुस्तिका देण्यात यावी, यावेळी आरक्षणाचा फायदा होणाऱ्या विद्यार्थ्यांसह अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना प्रथमच जातीचे प्रमाणपत्र व नॉन क्रिमेलिअर प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदत द्यावी. दरवर्षी प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीत विविध आरक्षणाच्या शिल्लक जागांचे कनर्व्हजन खुल्या प्रवर्गात करावे, शासनाने प्रवेश प्रक्रियेतील पार्ट 2 मधील माहिती अद्ययावत केली नसेल त्या विद्यार्थ्यांनी पुर्वी भरलेली माहिती ग्राह्य धरण्यात यावी. विशेष फेरी 1 नंतर ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याऐवजी विशेष फेरींची संख्या वाढवावी. 10 वीच्या आक्टोबर मध्ये घेण्यात आलेल्या फेर परिक्षेचे निकाल लवकर लावावे,. दरवर्षी प्रवेश प्रक्रियेतील फीचा काही हिस्सा मार्गदर्शशक केंद्र व शाळांना प्रोसेसिंग फी म्हणून खर्चासाठी देण्यात यावा. सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे कोविडमुळे तसेच लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रवेश प्रक्रियेची माहिती अद्याप सुस्पष्टपणे पोहचलेली नाही. तसेच विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गोंधळाची स्थिती आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुर्ण माहिती उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.

अद्याप 1 लाख विद्यार्थ्यांना प्रवेश न मिळाल्यामुळे तसेच वारंवार विद्यार्थी पालक यांच्याकडून तक्रारी येत असल्यामुळे आवश्यकता भासल्यास विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन एखाद्या समिती मार्फत या संपुर्ण प्रक्रियेचे पुर्नरावलोकन करून यातील दोष दूर करण्यात यावे अशी विनंती आमदार अँड आशिष शेलार यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *