महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २२ डिसेंबर – पुणे – थंडीच्या कडाक्याने पुण्यासह, विदर्भ, मराठवाडाही गारठला. त्यामुळे चौका-चौकात शेकोट्या पेटल्याचे चित्र दिसत होते. पुण्यात किमान तापमानाचा पारा मंगळवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत ८.१ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरला. येत्या २४ तासांमध्ये किमान तापमान अंशतः वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला.
राज्यात जवळपास सर्वच ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत घट झाली आहे. विदर्भात ८ ते १२ अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली. तर मराठवाड्यात ५ ते ११, मध्य महाराष्ट्रात ८ ते १४, कोकणात १६ ते १८ अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली.
विदर्भात थंडीची लाट
विदर्भात येत्या गुरुवारी (ता. २४) आणि शुक्रवारी (ता. २५) थंडीचा लाट येईल, असा इशारा हवामान खात्यातर्फे देण्यात आला. राज्यात सर्वांत कमी तापमान परभणी येथे ७.६ अंश सेल्सिअस नोंदण्यात आले. राज्यातील २८ शहरांमधील किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्ष कमी झाल्याचे निरीक्षण हवामान खात्यातर्फे नोंदण्यात आले.