दुसऱया कसोटी साठी हनुमा विहारी ऐवजी जडेजाला संधी शक्य

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २३ डिसेंबर – ऑस्ट्रेलियाविरुद्ध दि. 26 डिसेंबरपासून खेळवल्या जाणाऱया दुसऱया कसोटी सामन्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघव्यवस्थापन रवींद्र जडेजाच्या स्वास्थ्यातील प्रगतीकडे बारीक लक्ष ठेवून असून तो जर पूर्ण तंदुरुस्त असेल तर अंतिम संघात हनुमा विहारीऐवजी त्याला स्थान मिळेल, असे संकेत आहेत. जडेजाला या दौऱयातील पहिल्या टी-20 सामन्यात कन्कशनचा सामना करावा लागला आणि त्यानंतर धोंडशिरेच्या दुखापतीला देखील सामोरे जावे लागले आहे.

अर्थात, मागील काही दिवसांपासून, अगदी भारतीय संघ पहिल्या कसोटीत खेळत असताना जडेजाने हलक्या सरावाला सुरुवात केली आहे. सध्या तो उत्तमरित्या सावरत आहे. पण, मेलबर्नमध्ये शनिवारपासून खेळवल्या जाणाऱया दुसऱया कसोटी सामन्यासाठी तो पूर्ण 100 टक्के तंदुरुस्त होईलच, याची खात्री देता येणार नाही, अशी स्थिती आहे. तो तंदुरुस्त असेल तर मात्र आंध्र प्रदेशचा फलंदाज हनुमा विहारीला संघाबाहेर व्हावे लागेल, असे चित्र आहे. यापूर्वी ऍडलेड कसोटीत विहारीची फलंदाजी निराशाजनक राहिली. अजिंक्य रहाणे व रवी शास्त्री कोणती रणनीती आखणार, यावरही बरीच समीकरणे अवलंबून असतील.

‘जडेजा गोलंदाजीत मोठे स्पेल टाकण्याइतपत तंदुरुस्त असेल तर काही वादाचे कारणच असणार नाही. अष्टपैलू खेळाच्या बळावर जडेजाला संधी मिळेल. शिवाय, एमसीजीवरील त्या लढतीत पाच गोलंदाज खेळवण्याचा पर्यायही भारताला अमलात आणता येईल’, असे बीसीसीआयमधील वरिष्ठ सूत्राने गोपनियतेच्या अटीवर नमूद केले.

जडेजा विदेशात प्रभावी

जडेजाने 49 कसोटी सामन्यात 35 पेक्षा अधिक सरासरीने 1869 धावा केल्या असून यात त्याने 1 शतक व 14 अर्धशतके झळकावली आहेत. त्याने इंग्लंड-ऑस्ट्रेलिया भूमीतील मागील दौऱयात शानदार अर्धशतकेही साजरी केली आहेत. फक्त फलंदाजी हा एकच निकष समोर ठेवला तर ‘स्पेशालिस्ट विहारी’ व ‘अष्टपैलू जडेजा’ यांच्यात फारसा फरक नाही, हे सुर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे. मोहम्मद शमी यापूर्वीच मालिकेतून बाहेर फेकला गेला असून यामुळे खबरदारी घेण्याच्या दृष्टिकोनातून भारताला चारऐवजी पाच गोलंदाज खेळवावे लागतील, अशी शक्यता अधिक आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *