लवकरच ठरणार मराठी साहित्य संमेलनाची रूपरेषा ? 3 जानेवारीला औरंगाबादमध्ये बैठक

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २३ डिसेंबर – यंदाच्या साहित्य संमेलनावर कोरोनाचे सावट असल्यामुळे आगामी वर्षातील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबाबत अद्यापही कोणताच ठोस निर्णय साहित्य महामंडळाकडून घेण्यात आलेला नाही. मात्र आता त्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. साहित्य महामंडळाने सर्व घटक, संलग्न व समाविष्ट संस्थांची येत्या 3 जानेवारीला औरंगाबाद येथे बैठक बोलावली आहे. सर्व सदस्यांनी संमेलन आयोजनासाठी होकार दर्शविल्यानंतर स्थळ निवड समिती, संमेलन नियोजन समितीची नियुक्ती करण्याची प्रक्रिया केली जाणार आहे. बदललेल्या परिस्थितीत आयोजनाची तयारी कशी असेल, यावर निर्णय ठरेल.

साहित्य महामंडळाकडे आगामी संमेलनासाठी नाशिक, अंमळनेर आणि पुण्यातील सरहद संस्थेचे दिल्लीकरिता अशा तीन ठिकाणांहून संमेलनासाठी निमंत्रणे आली आहेत. वर्धा येथून निमंत्रण येण्याची शक्यता आहे. एप्रिल २०१५ मध्ये पंजाबमधील घुमान येथे संमेलन आयोजित करण्याचा मान सरहद संस्थेला देण्यात आला होता. जानेवारीमध्ये उस्मानाबाद येथे झालेल्या साहित्य संमेलनावेळी नाशिक आणि अंमळनेर येथून पुढील संमेलनासाठी निमंत्रणे आली होती.त्या निमंत्रणावर बैठकीत चर्चा होणार आहे. मात्र करोनामुळे परिस्थिती बदलल्याने या दोन शहरातील संस्थांची आर्थिक तयारी आहे का, याचा विचार केला जाणार आहे. याउलट सरहदने ऐन करोनाकाळात महामंडळाला प्रस्ताव पाठवून आगामी संमेलन दिल्लीत घेण्याची विनंती केली आहे. मात्र महामंडळाने अद्याप सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. करोनामुळे हे वर्ष आर्थिक संकटातून जात असताना संमेलनासाठी निमंत्रण देणार्‍या संस्था आयोजनाबाबत पुर्नविचार करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान, स्थळ निश्चित नसल्याने महामंडळाला शासनाकडून संमेलनासाठी मिळणारे ५० लाख रुपयांचे अनुदान देखील अद्याप मिळू शकलेले नाही. शासनाकडून महामंडळाला सातत्याने विचारणा होत आहे. मात्र महामंडळाने अद्याप शासनाला संमेलनाबाबत ठोस कोणताही निर्णय कळविलेला नाही. त्यामुळे या बैठकीकडे मराठी बांधवांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *