महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २९ डिसेंबर – सेंच्युरिअनच्या मैदानावर खेळवण्यात येणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेने वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. श्रीलंकेचा पहिला डाव ३९६ धावांवर संपवल्यानंतर आफ्रिकेने पहिल्या डावात फाफ डु-प्लेसिसचं शतक आणि डीन एल्गर-एडन मार्क्रम आणि टेंबा बावुमा, केशव महाराज यांच्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर ६२१ धावांपर्यंत मजल मारत भक्कम आघाडी घेतली. फाफ डु-प्लेसिसचं द्विशतक अवघ्या एका धावेने हुकलं.
तुलनेने नवख्या श्रीलंकन संघाविरुद्ध खेळताना आफ्रिकेच्या संघाने सामन्यावर सुरुवातीपासूनच वर्चस्व राखलं होतं. सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केल्यानंतर अनुभवी फाफ डु-प्लेसिसने श्रीलंकेच्या गोलंदाजांचा समाचार घ्यायला सुरवात केली. मैदानात चौफेर फटकेबाजी करत डु-प्लेसिसने २७६ चेंडूत २४ चौकारांसह १९९ धावा केल्या. डी-सिल्वाच्या गोलंदाजीवर करुणरत्नेने झेल घेत डु-प्लेसिसला माघारी धाडलं. यानंतर आफ्रिकेच्या तळातल्या फलंदाजांना माघारी धाडण्यातही श्रीलंकेच्या संघाला बरेच प्रयत्न करावे लागले. डु-प्लेसिसनंतर आफ्रिकेकडून बावुमा आणि केशव महाराजने अर्धशतक झळकावत लंकेच्या अडचणींमध्ये भर घातली.
आफ्रिकेचा पहिला डाव संपुष्टात आल्यानंतर श्रीलंकेच्या दुसऱ्या डावाची सुरुवातही खराब झाली. कर्णधार दिमुथ करुणरत्ने आणि कुशल मेंडीस हे एन्गिडीच्या गोलंदाजीवर स्वस्तात माघारी परतले. अखेरीस कुशल परेरा आणि दिनेश चंडीमल संघाडी पडझड थांबवली. तिसऱ्या दिवसाअखेरीस श्रीलंकेच्या संघाने २ बाद ६५ पर्यंत मजल मारली. आफ्रिकेच्या संघाकडे अद्याप १६० धावांची आघाडी असून डावाने विजय मिळवण्याची चांगली संधी त्यांच्याकडे उपलब्ध आहे. चौथ्या दिवशी श्रीलंकेचा संघ आफ्रिकेच्या माऱ्याचा कसा सामना करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.