महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ३० डिसेंबर – भारतात बनणाऱया लघुकालावधीच्या व्हिडीयो ऍप्सना बाजारात 40 टक्के इतका वाटा प्राप्त करता आला आहे. भारत सरकारच्या चिनी ऍप टिकटॉकवरील बंदीनंतर भारतीय व्हिडीयो ऍप्सना प्रतिसाद मिळतो आहे. लघु व्हिडियो तयार करणाऱया जोश या ऍपने बाजारात दमदार वाटा काबीज केला आहे. टिकटॉकवरील बंदीनंतर साधारण 170 दशलक्ष टिकटॉक ग्राहक दुसऱया पर्यायी लघु व्हिडियो ऍपच्या शोधात होते, असे दिसून आले आहे.
जून 2018 मध्ये 85 दशलक्ष इतके ग्राहक टीकटॉकने जोडले होते, ज्यांची संख्या वाढून जून 2020 पर्यंत 167 दशलक्ष वर पोहोचली. राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावरून अखेर टिकटॉकवर भारत सरकारने बंदी घातली. त्यानंतर भारतीयांनी स्थानिक ऍप्सचा शोध सुरू केला. जोश यांच्या मालकीचे डेली हंट यांनी एमएक्स टकाटक, रोपोसो, चिंगारी, मौज मित्रो, टेल असे विविध ऍप्स बाजारात दाखल केले. याला अनुषंगून फेसबुक आणि युटय़ुब यांनीही लघु व्हिडियो ऍपची सेवा ग्राहकांकरता उपलब्ध केली. लघु व्हिडियोच्या ऍप्सना मिळणारी पसंती लक्षात घेऊन अनेकांनी या स्पर्धेत उडी घेण्याचा प्रयत्न केला.
बेंगळूरच्या सल्लागार फर्म रेडसीरने भारतीय लघु व्हिडिओ ऍप्सनी सध्याला 40 टक्के इतका बाजारात वाटा प्राप्त केला असल्याचे सांगितले. यात जोश कंपनीने चांगली प्रगती दर्शवली आहे. व्हिडियोसाठी आवश्यक दर्जात्मक कन्टेन्ट देण्यामध्ये या ऍपला यश आले आहे. भारतीय ऍपकर्ते कल्पक विचारांच्या माध्यमातून चांगला कंटेंट देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे रेडसीरने म्हटले आहे. येत्या जानेवारीमध्ये ऍप वापरकर्त्यांची संख्या वाढण्याची शक्मयता असून पुढील पाच वर्षाच्या कालावधीत यात आणखी चारपट वाढ होण्याचा अंदाज रेडसीरने व्यक्त केला आहे. त्यामुळे या क्षेत्रात स्पर्धा वाढणार आहे.
