महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २ जानेवारी – अग्गंबाई सासूबाई या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. बबड्या, शुभ्रा, आसावरी, अभिजीत, आजोबा या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आवडतात. विशेष म्हणजे आजोबांची भूमिका साकारलेले ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन हे सर्वांचे लाडके आजोबा झाले होते. त्यांचे सोम्या कोंबडीच्या, चप्पलचोर ही त्यांची बोलण्याची स्टाईल खुपच लोकप्रिय झाली होती. मात्र, काही दिवसापूर्वी रवी पटवर्धन यांचे अचानक निधन झाले. पटवर्धन यांच्या जाण्याने मालिकेसह चाहत्यांच्या मनात एक पोकळी निर्माण झाली होती. मात्र, मालिकेतील आजोबा परत येतायत. त्यामुळे सर्वांच्या घरात सोम्या कोंबडीच्या, चप्पलचोर चा आवाज पुन्हा (Veteran actor Mohan Joshi to play Aajoba in Aggabai Sasubai)घुमणार आहे.
रवी पटवर्धन यांच्या अभिनयामुळे आजोबांची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. आता या भूमिकेत आपल्याला ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना पाहायला मिळणार आहे. मोहन जोशी यांची ४ जानेवारीला या मालिकेत एंट्री होणार आहे. त्यांच्या एंट्रीचे काही फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मोहन जोशी यांनी अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केले आहे. सध्या ते कलर्स मराठीवरील जीव झाला येडापिसा या मालिकेत सध्या महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. तसेच, त्यांनी मराठीप्रमाणेच हिंदी चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या अभिनयाचे नेहमीच कौतुक केले जाते. बॉलिवूडमध्ये त्यांनी खलनायक म्हणून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.