ब्रिटनमध्ये लॉकडाउनची घोषणा ; नव्या स्ट्रेनचे देशभरात थैमान

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. ५ जानेवारी – ब्रिटनमध्ये करोना विषाणूच्या नव्या स्ट्रेनचे थैमान सुरू आहे. करोनाबाधितांची संख्या वाढत असून सरकार, प्रशासनाची चिंता वाढली आहे. बाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी इंग्लंडमध्ये सोमवारी पुन्हा एकदा लॉकडाउनची घोषणा केली. करोनाचा नवा स्ट्रेन अधिक फैलावू नये यासाठी कमीत कमी फेब्रुवारी मध्यपर्यंत नवीन स्टे-ऑन-होम लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे जॉन्सन यांनी सांगितले.

लॉकडाउनच्या घोषणेनंतर पंतप्रधान जॉन्सन यांनी नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन केले. मंगळवारपासून शाळा, कॉलेज, विद्यापीठाचे वर्ग ऑनलाइन होणार असल्याचे त्यांनी सांगितले. लॉकडाउनच्या घोषणेनंतर आता लोकांना घरातून बाहेर पडता येणार नाही. बोरिस जॉन्सन यांनी देशाला संबोधित करताना म्हटले की, ज्याप्रकारे करोनाचा संसर्ग फैलावत आहे, त्यानुसार आपल्याला त्याचा सामना करण्यासाठी आणखी मेहनत घ्यावी लागणार आहे. करोनाच्या नव्या स्ट्रेनला रोखण्यासाठी कठोर उपाययोजनांची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. फक्त अत्यावश्यक कामासाठी लोकांना घराबाहेर पडता येणार आहे.करोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे ब्रिटनच्या प्रशासनाची चिंता वाढली आहे. सोमवारी ब्रिटनमध्ये सातत्याने सातव्या दिवशी ५० हजारांहून अधिक बाधित आढळले. ब्रिटनमध्ये आतापर्यंत २७ लाखांहून अधिकजणांना करोनाची बाधा झाली आहे.

ब्रिटनमध्ये लसीकरण मोठ्या प्रमाणावर सुरू करण्यात आले आहे. इतर युरोपीयन देशांच्या तुलनेने ब्रिटनमध्ये सर्वाधिक लस देण्यात आली असल्याचे जॉन्सन यांनी सांगितले. ब्रिटनमध्ये सोमवारपासून ‘ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेका’ची लस देण्यास सुरुवात केली असून, या लशीचा पहिला डोस ८२ वर्षांच्या डायलिसिस रुग्णाला देण्यात आला. या आधी ब्रिटनमध्ये फायझर लशींच्या वापराला सुरुवात झाली आहे. आता अॅस्ट्राझेनेकाच्या रूपामध्ये दुसऱ्या लशीलाही मान्यता मिळाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *