आयुर्वेद एक समृद्ध जीवनशैली!

Spread the love

आयुर्वेद! एक कार्य-कारण भावावर अधिष्ठित भारतीय प्राचीन वैद्यक शास्त्र!

ऋषीमुनींनी केवळ भारतीयांनाच नव्हे, तर सर्व मानवजातीला दिलेली देणगी. दुर्दैवाचा भाग असा की ब्रिटिशांनी लादलेल्या शिक्षणपद्धतीमुळे आयुर्वेद आणि सर्वच प्राचीन भारतीय शास्त्रांची संपूर्ण भारतीय समाजालाच माहिती करुन देण्याची गरज निर्माण झालेली आहे. विशेषतः स्वातंत्र्यानंतर तरी आयुर्वेदाला योग्य स्थान मिळावयास हवे होते. परंतु पंडित नेहरुंच्या मतानुसार आधुनिक वैद्यक हे भारताचे वैद्यक ठरवले गेले व पुढची सर्व धोरणे त्याच अनुषंगाने ठरवली.

वैद्यराज श्री. पंडित शिवशर्मा यांच्या प्रेरणेने आणि पुढाकाराने आयुर्वेदाचे स्वतंत्र कौन्सिल (सीसीआयएम) निर्माण करण्यात आले आणि भारतभर आयुर्वेदाचा एकच अभ्यासक्रम सुरु करण्यात आला. परंतु इतक्या वर्षांच्या परंपरा तुटल्याने आणि आधुनिक वैद्यकातल्या काही महत्वाच्या टप्प्यांमुळे आयुर्वेदाचे पुनरुज्जीवन ही गोष्ट अवघड झाली आणि अद्यापही आहे. विशेषतः मायक्रोस्कोपच्या शोधाने सूक्ष्म जंतूंचा शोध लागला आणि कॉलरा, टीबी यासारखे आजार रोगजंतूंमुळे होतात, असे स्पष्ट झाले. पुढे पेनिसिलीनरुपी प्रतिजैविक हाती गवसले आणि पुढे त्यांची मालिकाच सुरु झाली. यामुळे रोगजंतूंमुळे उत्पन्न होणार्यात रोगांकडे बघण्याचा दृष्टिकोणच पूर्णपणे बदलला. वास्तविक केवळ रोगजंतूंमुळेच रोग होत नाहीत, तर ढासळलेली प्रतिकारशक्ती रोगाचे कारण असते, हे माहित असूनही प्रतिकारशक्ती टिकवणे किंवा वाढवणे यासाठी आता फारच नगण्य प्रयत्न केले जातात.

वनस्पती किंवा प्राणीसृष्टी यांच्या बाबतीतही सूक्ष्म जंतूंनी उद्भवणार्याव आजारांबाबत हेच प्रतिजैविके किंवा कीटकनाशके यांचे धोरण अवलंबिले गेल्यामुळे त्यांच्यातही या कीटकनाशके यांना दाद न देणार्या सूक्ष्म जंतूंच्या जाती निर्माण झाल्या. या अनैसर्गिक गोष्टींच्या वापराने पाण्याची, जमिनीची आणि एकंदरच वनस्पती आणि प्राणीसृष्टीची मोठ्या प्रमाणात हानी झाली. निसर्गाचा समतोल पूर्णपणे ढासळला.

उत्पादन वाढावे किंवा वनस्पतीजन्य किंवा प्राणीजन्य उत्पादने अधिक मोठी किंवा दिखाऊ व्हावीत, म्हणून मोठ्या प्रमाणात संकरित जाती निर्माण करण्यात आल्या. त्यांना स्वतःची प्रतिकारक्षमता नसल्यामुळे ती खाऊन आम्हाला प्रतिकारशक्ती कशी मिळेल? एकंदरीने विचार करता नैसर्गिकरितीने प्रतिकारशक्ती वाढवणे हेच जंतूजन्य रोगांसाठी मूलगामी औषध आहे. आयुर्वेदातील स्वस्थवृत्त आणि रसायनचिकित्सा हा त्यावरचा उत्तम उपाय आहे.

भूल देण्याच्या पद्धतीत मोठ्या प्रमाणात वादातीत यश मिळाल्यामुळे आधुनिक वैद्यकात शल्यतंत्राला खूप मोठा वाव मिळाला. अर्थात आयुर्वेदानेही शल्यतंत्राचे महत्त्व जाणलेले होते आणि सुश्रुताचार्य हे जगातले पहिले शल्यविशारद आणि प्लास्टिक सर्जनही आहेत. ही गोष्ट सर्वमान्य आहे. युद्धे फार पूर्वीपासून चालत आलेली असल्यामुळे त्यात हात-पाय तुटण्यापासून शरीरात कुठेही तलवार, भाला, बाण खुपसले जाण्याच्या घटना नेहमी घडत असत. आताच्या रेड क्रॉस प्रमाणे युद्धभूमीवर जाऊन योद्ध्यांची चिकित्सा करावी, असे सुश्रुताचार्य सांगतात. हजारो वर्षांची ही शल्यचिकित्सेची परंपरा मधल्या काळात लुप्त झाली. भूल देण्याच्या पद्धतीतील सुधारणेमुळे आधुनिक वैद्यकातील शल्यतंत्राला खूपच वाव मिळाला.

दुसर्याि बाजूला वेदनाशमन औषधे, स्टिरॉइड स्वरुपाची औषधे यांनी लक्षणे किंवा वेदनांपासून तात्काळ मुक्ती मिळवता येऊ लागली. याचा जनमानसावर खूपच मोठा परिणाम झाला. कोणत्याही कारणांचा शोध न घेता किंवा कोणतीही बंधने न पाळता लक्षणांपासून मुक्ती मिळणे ही सर्वसामान्य लोकांसाठी तात्पुरती का होईना पण निश्चित आनंदाची बाब होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सामान्य लोक आधुनिक वैद्यकाकडे आकृष्ट झाले आणि आधुनिक वैद्यकाला सर्व जगभरात प्रथम पसंतीच्या वैद्यकाचा बहुमान प्राप्त झाला. परंतु, या विचारसरणीतील फोलपणा लक्षात येऊन विशेषतः पाश्चात्य देशांमध्ये विचारमंथन सुरु झाले. रोगजंतूंना सृष्टीमध्ये वाढावयास वाव मिळू नये, म्हणून स्वच्छतेचे बाळकडू लहानपणा पासून आचरणात आणले गेले. स्वच्छ पाणी, स्वच्छ हवा, स्वच्छ अन्न यावर भर दिला गेला. सांडपाण्याचा निचरा योग्य प्रकारे होईल, अशी काळजी घेतली गेली. परिणामी जंतुसंसर्गाने होणार्याद रोगांचे प्रमाण बरेच कमी झाले. विकसनशील देशांनी या गोष्टींवर खूप भर देणे गरजेचे आहे.
रोगजंतूंनी शरीरात रोग निर्माण केल्यावर बाहेरुन प्रतिजैविकांची फौज आणून शरीराचा युद्धभूमिसारखा वापर करणे खरेतर योग्य नाही. चाणक्यांच्या मतानुसार ज्या भूमीवर युद्ध लढले जाते त्याची निश्चितच हानी होते. म्हणून युद्ध अटळ असल्यास ते शत्रूच्या भूमीत लढले जावे. तेव्हा स्वच्छतेचे नियम पाळून रोगजंतूंना वाढायला वाव न देणे हाच शहाणपणाचा मार्ग होय. कीटकनाशके आणि रासायनिक खते यांच्या अमर्याद वापरामुळे सृष्टीची झालेली हानी भरून काढण्यासाठी पर्यावरणवादाची चळवळ प्रथम परदेशात सुरु झाली. अद्यापही बरीच सर्वसामान्य माणसे यापासून दूरच आहेत. भारतात तर याविषयी खूपच कमी जागृती आहे. अर्थात सिक्कीमसारखे राज्य पूर्णतः सेंद्रिय शेती करू लागले आहे. विशेषतः गीर जातीच्या देशी गायींची पैदास वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरु झाले आहेत. आणि पद्मश्री सुभाष पाळेकर यांच्या प्रेरणेने अनेक शेतकरी देशी वाणांवर आधारित नैसर्गिक आणि विषमुक्त शेतीकडे वळले आहेत. पुढच्या 5-10 वर्षात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक शेतीचा वापर सुरु होईल आणि त्याचे सुयोग्य परिणाम दिसू लागतील हे निश्चित.

खरेतर नैसर्गिक जीवनशैलीपासून दूर जाणे हेच हल्लीच्या रोगांचे मूळ कारण आहे. पूर्वी सूर्योदयाच्या आधी पहाटे ब्राह्म मुहूर्तावर उठण्यापासून दिनक्रम सुरु व्हायचा आणि सूर्यास्तानंतर सर्व व्यवहार आटोपते घेऊन रात्रीचा वापर विश्रांतीसाठी व्हायचा. विजेच्या शोधाने ही सर्व घडी विस्कटून गेली. रात्रीचा दिवस झाला. रात्री उशीरा जेवणे, उशीरा झोपणे, सकाळी उशीरा उठणे या गोष्टी अंगवळणी पडल्या. अन्नाचा कस कमी झाला, व्यायाम, योगाभ्यास याकडे दुर्लक्ष झाले, स्त्रियाही कमावत्या झाल्यामुळे कुटुंबव्यवस्थेला तडा गेला. बाहेरून चविढवीचे हानिकारक पदार्थ आणण्याची प्रथा फोफावली. आणि यातून आरोग्यविषयक तक्रारी सुरु झाल्यावर आधुनिक वैद्यकातील औषधांनी लक्षणापासून मुक्तीलाच योग्य आणि शास्त्रीय चिकित्सा असा समज निर्माण झाला. औषधांमधील अपयश शल्यतंत्राच्या सहाय्याने लपविले गेले. अवयव प्रत्यारोपणाला कमालीचे महत्त्व प्राप्त झाले. आताही अत्त्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन प्रायःलक्षणांपासून मुक्ती याच गोष्टींवर लक्ष केंद्रित केले जात आहे.
आधुनिक वैद्यक प्रधान वैद्यक झाल्यामुळे आयुर्वेदासारखी प्राचीन आणि भरभक्कम शास्त्रीय पाया असलेली वैद्यकेसुद्धा भारतात देखील पर्यायी वैद्यके झाली. त्यामुळे आधुनिक वैद्यकाचे उपचार संपल्यावरच लोक आयुर्वेदाकडे वळू लागली. आयुर्वेदाचा शास्त्रीय ज्ञानाचा पाया भरभक्कम असल्यामुळे अत्यंत अवघड आणि गुंतागुंतीच्या रुग्णांमध्ये सुद्धा आयुर्वेदीय उपचारांचे खूप चांगले परिणाम दिसून येत असल्यामुळे लोकांचा आयुर्वेदाकडे वाढता ओढा आहे. मात्र सगळे उपचार थकल्यानंतरच आयुर्वेदाकडे येण्याची मानसिकता बदलण्याची गरज आहे. किंबहुना आजारी पडूच नये, यासाठी आयुर्वेदाने स्वस्थवृत्त प्रकरणात केलेला उपदेश लाख मोलाचा आहे. तो आचरणात आणला तर खर्याक अर्थाने रोगमुक्तीसाठी उपचाराची गरजच राहणार नाही.

अमेरिकेतील इप्रसारण इंटरनेटच्या माध्यमातून माझ्या ‘आयुर्वेदीय जीवनशैली आरोग्याची ‘गुरुकिल्ली’, ‘आयुर्वेदीय आहार-जीवनाचा आधार’ आणि ‘गुंतवणूक आरोग्यातली’ या प्रत्येक विषयाच्या प्रत्येकी 4-4 मुलाखती सर्व जगभरात प्रकाशित झालेल्या आहेत. त्यातील 5 मुलाखती www.eprasaran.com या संकेतस्थळावर कायमच्या उपलब्ध आहेत आणि मराठी, हिंदी आणि इंग्रजीतील सर्व मुलाखती www.mixcloud.com या संकेतस्थळावर कायमच्या उपलब्ध आहेत. वाचकांनी त्या जरुर ऐकाव्यात. कॅन्सर, हृदयरोेग, मधुमेह, अॅरलर्जी, हॉर्मोनल इम्बॅलन्स या विविध रोगांच्या संदर्भातील मुलाखतीदेखील या माध्यमातून प्रकाशित झालेल्या आहेत. माझी या विषयीची अनेक पुस्तके मराठी आणि इंग्रजीतून प्रकाशित झालेली आहेत. सर्वांनी त्याचाही जरूर लाभ घ्यावा.

या सर्वाचा सारांश इतकाच की आयुर्वेदाकडे पर्यायी वैद्यक म्हणून न पाहता ती एक आदर्श जीवनपद्धती आहे म्हणून अंगी बाणवावी. स्वास्थ्यरक्षण आणि संवर्धन करुन आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य प्राप्त करावे. त्यातूनही गरज पडलीच, तर आयुर्वेदीय उपचारांचा आणि पथ्यापथ्य संकल्पनेचा योग्य वापर करुन मुळापासून रोग दुरुस्त करावा. निदान भारतीयांना तरी आयुर्वेदासारख्या प्राचीन शास्त्रांचा उपयोग करून घेता आला पाहिजे. आणि त्याविषयी सार्थ अभिमान असायला पाहिजे. सर्वांना उत्तम आयुरारोग्य लाभो, ही धन्वंतरीचरणी प्रार्थना!

वैद्य दिलीप गाडगीळ
एम. डी. पीएच. डी. (आयुर्वेद)
एम. फिल. (संस्कृत)
email – gadgil.dilip@gmail.com
गायत्री आयुर्वेदिक क्लिनिक, कर्वेनगर 02025473100 / 7767999336
सदाशिव पेठ दवाखाना 02024475360 / 7767999335