दस्तुरखुद्द पवारसाहेब सांगताहेत अजित पवार भाजपसोबत गेल्याचे कारण…

Spread the love

। महाराष्ट्र 24 । मुंबई ।
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. या शपथ विधीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्षांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. मात्र अजित पवार यांनी एका रात्रीत हा निर्णय का घेतला?, असा प्रश्न महाराष्ट्रालाच नव्हे तर तर संपूर्ण देशाला पडला होता. या प्रश्नाचे उत्तर, खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहे. पाहूया काय आहे नेमके कारण…

अजित पवार यांनी एकाएकी भाजपसोबत जाण्याचा निर्णय का घेतला? यावर शरद पवार यांनी जे घडलं ते मुलाखतीत स्पष्ट केलेय… शरद पवार म्हणाले, ’ज्या दिवशी नेहरू सेंटरमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेची बैठक झाली. त्या बैठकीत काँग्रेसच्या काही नेत्यांसोबत माझा वाद झाला. हा वाद सत्ता स्थापनेशी संबंधित विषयावर नव्हता. तर, दुसर्‍या विषयावर होता. परंतु, अजित पवार यांना हे आवडले नाही. ’हे आताच जर असे बोलत असतील तर, पुढे एकत्र काम कसे करायचे?’, असा प्रश्न अजित पवार यांच्या मनात होता. त्यामुळे त्यांनी रात्रीत देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून, सगळा खटाटोप केला आणि सकाळी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यावेळी मला सकाळी सुप्रियाने उठवले. मला याची काहीच कल्पना नव्हती. पण, ते ऐकून मला धक्का बसला. मात्र, हा माझा निर्णय नाही, हे मला जनतेला सांगायचे होते.’

पवार म्हणाले, ’अजित पवार यांचा निर्णय पाहिला तर, काही वेळातच मला खात्री झाली होती की हे आपण दुरुस्त करू शकतो. कुटुंबात या निर्णयामुळे कटूता आल्याचे सगळ्यांना वाटत होते. त्यात सुप्रियाने थेट कुटुंब आणि पक्ष फुटल्याचे म्हटले होते. परंतु, ते होऊ द्यायचे नाही, हे मी ठरवले होते. मुळात कुटुंबात मतभेद असू शकतात. परंतु, पक्षात मतभेद होऊ द्यायचे नाहीत, हे मी ठरवले होते. ज्या वेळी अजितने चूक मान्य केली. त्यावेळी तुला याची किंमत मोजावी लागेल, असे मी बजावले होते. अजित पवार यांना माफ करावे, अशी भूमिका सगळ्यांची होती. पण, एक मेसेज जावा यासाठी अजित पवार यांना पहिल्यांदा शपथ घेण्याची संधी देण्यात आली नाही.’