शिवाजी महाराजांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून घडविणार्‍या ‘राजमाता जिजाऊ’!

Spread the love

महाराष्ट्र 24 – राजमाता जिजाऊ या मराठा साम्राज्याच्या संस्थापक, स्वराज्याच्या संकल्पक, संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री आणि प्रतापशाली छत्रपती संभाजी माहाराज यांच्या आजी होत्या. या दोन शूरवीर राजांना घडविण्यात या धैर्यवान माऊलीचा सर्वात मोठा हात. राज माता जिजाऊं यांचा 12 जानेवारी रोजी जन्मदिवस. राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र 24तर्फे विनम्र अभिवादन! मानाचा मुजरा…

जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 ला बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे लखुजी जाधव यांच्या घरी झाला. लखुजी जाधव यांच्या पत्नी म्हाळसाबाई उर्फ गिरीजाबाई या निंबाळकर घराण्याच्या होत्या. लखुजी जाधवांना दत्ताजी, अचलोजी, रघुजी आणि म्हादुजी हे चार पुत्र आणि जिजाऊ ही एककन्या अशी पाच अपत्ये होती. शिक्षण, तत्कालिन सुखवस्तू मराठा मुलींप्रमाणे जिजाऊंचे योग्य संगोपन करण्यात आले. त्या तांडपट्टा अश्वारोहण वगैरे युद्ध कलांमध्ये निष्णात तसेच पारंगत होत्या. जिजाऊंचा विवाह मालोजी राजे भोसले यांचे चिरंजीव शहाजी राजे भोसले यांच्यासोबत दौलताबाद येथे डिसंबर 1605 साली मोठ्या थाटामाटात झाला. मालोजींना निजामशहांकडून पाच हजारी मनसबदारी शिवनेरी व चाकण हे किल्ले आणि पुणे व सुपे हे दोन परगणे जहांगीर म्हणून मिळाले. शहाजीराजांनी जिजाऊंना शिवनेरी किल्ल्यात सुरक्षित ठेवले.

शिवनेरी येथे 19 फेब्रुवारी 1630 साली जिजाऊंनी शिवबांना जन्म दिला. जिजाबाईंना एकूण 8 अपत्ये होती त्यापैकी सहा मुली व दोन मुलगे होते. जिजाऊंचे पती शहाजीराजे फार पराक्रमी सेनानी होते. त्यांनी पुण्याजवळील अहमदनगर व विजापूर प्रदेश काबीज करून आपले स्वतंत्र राज्य स्थापन केले. 16 मे 1640 साली जिजाऊंनी शिवाजी महाराजांचा विवाह निंबाळकरांच्या सईबाईंशी लावून दिला. यावेळी शहाजी विजापूरतर्फे बंगलोर येथे असल्यामुळे लग्नास येऊ शकले नव्हते. अशा रितीने जिजाऊंनी निंबाळकरांच्या मुलीच्या सईबाईंच्या सासू बनल्या. हिंदवी स्वराज्यासाठी जिजाऊंचे योगदान फार मौल्यवान आणि अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. जिजाऊंच्या अत्युच्च संस्कारांमुळेच छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे दोन युगपुरुष महान राजे, पराक्रमी योद्धे आख्ख्या हिंदुस्थानाला मिळाले. म्हणून छत्रपतींचा जयघोष करताना आपण आपसुक उद्गारतो… जय जिजाऊ…. जय भवानी, जय शिवाजी…

अशा या धैर्यवान मातेची आज जयंती…. त्यानिमित्त जिजाऊ माऊलींच्या पवित्र स्मृतीस ‘महाराष्ट्र 24’तर्फे विनम्र अभिवादन!!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *