त्यांना स्वतःला रिपब्लिकन म्हणवून घेण्याचा अधिकार राहिला नाही : रामदास आठवले

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. ९ जानेवारी – “अमेरिकेत जनमताचा कौल अमान्य करून डोनाल्ड ट्रम्प यांनी रिपब्लिकन संकल्पनेचा, लोकशाहीचा अवमान केला आहे. लोकशाहीत बहुमताचा सन्मान करून ट्रम्प यांनी जो बायडेन यांना पदाची सूत्रे सोपवणं आवश्यक होतं. ट्रम्प यांनी मात्र या उलट कृती करून स्वत:ची प्रतीमा मलिन करून घेतली आहे,” अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. तसंच त्यांना स्वत:ला रिपब्लिकन म्हणवून घेण्याचा अधिकार राहिला नसल्याचंही ते म्हणाले.

“अमेरिकेत रिपब्लिकन पक्षाचे नेते म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाबत आम्हाला आदर होता मात्र त्यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांचा झालेला पराभव मान्य न करता पदावर राहण्याची केलेली कृती लोकशाही विरोधी आणि रिपब्लिकन प्रतीमेला काळिमा फासणारी आहे. अमेरिकेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते जो बायडेन यांचा विजय झाला. मात्र त्यांच्या विजयला संमती देण्यात आडकाठी आणायचे हिन कृत्य डोनाल्ड ट्रम्प यांनी केले. अमेरिकेच्या संसदेत ट्रम्प यांच्या समर्थकांनी काल धुडगूस घातला. तो प्रकार अत्यंत निषेधार्ह आणि लोकशाही विरोधी आहे,” असे आठवले म्हणाले.

“अल्पमतात असताना बहुमताचा सन्मान केला नाही असे आजवर जगात कोणत्याही देशात घडले नाही ते अमेरिकेत ट्रम्प करीत आहेत. निवडणुकीत झालेला पराभव स्वीकारून ट्रम्प यांनी नव्याने पुढील निवडणुकीसाठी प्रयत्न करणे आवश्यक होते,” असेही त्यांनी नमूद केले.

“पराभव न स्वीकारता जनमताचा अनादर करून ट्रम्प यांनी रिपब्लिकनचा अवमान केला आहे. लोकशाहीचा अवमान केला आहे. भारतात ग्राम पंचायतीपासून संसदेपर्यंत लोकशाहीच्या न्यायानुसर बहुमताचा, जनमताचा सन्मान केला जातो. मात्र जगात महासत्ता असणाऱ्या अमेरिकेत सत्तांतर होताना ट्रम्प यांनी केलेला प्रकार लोकशाहीला मारक आहे. त्यांना स्वतःला रिपब्लिकन म्हणवून घेण्याचा अधिकार राहिला,” नाही अशी टीकाही आठवले यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *