महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. १० जानेवारी – एअर इंडियाच्या महिला वैमानिकांची टीम लवकरच इतिहास रचणार असून जगातील सर्वात लांब आणि आव्हानात्मक हवाई मार्ग असलेल्या उत्तर ध्रुवावरून उड्डाण करणार आहे. एअर इंडियाचे हे विमान सॅन फ्रॅन्सिस्को विमानतळावरून शनिवारी सायंकाळी उड्डाण केले असून तब्बल 16 हजार किमीचा हवाई मार्ग पार करत हिंदुस्थानी वेळेनुसार सोमवारी पहाटे 3.45 वाजता बंगळुरूच्या केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचणार आहे. हे नॉनस्टॉप उड्डाण असेल. पहिल्यांदाच इतक्या आव्हानात्मक मार्गाची धुरा महिला वैमानिकांच्या टीमवर सोपवली असून देशासाठी ही अभिमानाची बाब आहे. उत्तर ध्रुवावरून उड्डाण करणे हे खूप आव्हानात्मक असल्याने या हवाई मार्गासाठी सर्वात अनुभवी वैमानिकांनाच संधी दिली जाते.
या टीमचे नेतृत्व कॅप्टन झोया अग्रवाल करतील. त्यांच्या चमूत थान्मई पापागरी, मुंबईची आकांक्षा सोनावणे आणि शिवानी मनहास या अनुभवी कॅप्टनसह कार्यकारी संचालक कॅप्टन निवेदिता भसीन असतील. आकांक्षा सोनावणे हिने 2004 साली केबिन क्रु म्हणून करिअरला सुरुवात केली होती. आता ती बोईंग 777 वर को पायलट आहे.
उत्तर ध्रुवावर सगळीकडे बर्फ असतो. विमानाच्या पंखांवरही बर्फ साचतो. त्यामुळे पंख जड होतात. उत्तर ध्रुवावर गुरुत्वाकर्षण जास्त असल्याने दिशांची माहिती देणारे होकायंत्रदेखील काम करत नाही. अशा स्थितीत विमानातील अत्याधुनिक उपकरणे, जीपीएसचा डेटाच वैमानिकांना मार्ग दाखवतात. उणे 40 अंश तापमानात इंधन थिजू नये यासाठी त्यात रसायन मिसळले जाते.