महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ११ जानेवारी -भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान बॉर्डर-गावसकर ट्रोफीचा तीसरा कसोटी सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळला जात आहे. आज सामन्याचा निर्णायक ५ वा दिवस आहे. यजमान संघाने भारतासमोर विजयासाठी ४०७ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. मात्र, भारताचा निम्मा संघ तंबुत परतला आहे. यात शुबमन गिल (३१), रोहित शर्मा (५२), अजिंक्य रहाणे (४), रिषभ पंत (९७) अणि चेतेश्वर पुजारा (७७) हे दिग्गज फलंदाज बाद झाले आहेत. आता हनुमा विहारी आणि आर. अश्विन खेळपट्टीवर आहेत. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा दबाव पाहता भारतासमोर सामना वाचवण्याचे आव्हान आहे.
१०८ व्या षटकाच्या समाप्तीनंतर भारताची धावसंख्या ५ बाद २९९ होती. यावेळी अश्विन २४ आणि विहारी ६ धावांवर खेळत होते. त्यानंतर पुढच्या सलग सहा षटकांमध्ये (१०९, ११०, १११, ११२, ११३, ११४) दोघांनी एकही धाव न काढता ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना जागेवर उभे राहून खेळून काढले. या सहा निर्धाव षटकांनंतर ११५ व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर हनुमा विहारीने हेजलवुडच्या चेंडूवर एक धाव घेत भारताच्या ३०० धावा पूर्ण केल्या.
हनुमा विहारी आणि आर. अश्विन यांची संथ खेळी
चेतेश्वर पुजारा तंबुत परतला तेव्हा टीम इंडियाची अवस्था ५ बाद २७२ अशी झाली होती. निम्मा संघ बाद झाल्याने भारतावर दबाव वाढला. त्यानंतर हनुमा विहारी आणि आर. अश्विन यांनी मोर्चा सांभाळला. दोघेही संथ खेळी करत आहेत. त्यांच्या बचावात्मक खेळीने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना फेस आला आहे. विहारी-अश्विन जोडीला फोडण्यासाठी कांगारुच्या गोलंदाजांना झगडावं लागत आहे.