महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ११ जानेवारी – रोगनिदान आणि उपचाराच्या सुविधांची माफक उपलब्धता असतानाही जगात भारताने कोरोनोविरुद्धच्या लढाईत मोठी मजल मारली आहे. कोरोनाविषयक जागतिक अद्ययावत माहितीमध्ये भारताने कोरोनावर मात करून बरे होणार्या रुग्णसंख्येच्या कसोटीवर जगात पहिला क्रमांक मिळविला आहे. शिवाय कोरोनामुळे होणारा मृत्यूदर रोखण्यातही भारताची अव्वल कामगिरी पुढे आली असून, केंद्र सरकार, देशातील विविध राज्यांच्या प्रशासकीय यंत्रणा आणि नागरिकांच्या सतर्कतेला याचे श्रेय जात आहे. हीच किंबहुना अधिक काटेकोरपणाने नागरिकांनी कोरोनाविषयक सतर्कता कायम राखली तर कोरोनाची भारतात नव्याने दाखल होणारी वंशावळ रोखण्यास यश मिळू शकते.
जगात सुमारे नऊ कोटी नागरिकांना कोरोनाची बाधा झाली. त्यामध्ये भारतातील शनिवारअखेर (दि. 9) 1 कोटी 4 लाख 51 हजार 346 बाधितांचा समावेश होता. यापैकी 96.40 टक्के रुग्णांनी कोरोनावर विजय मिळविला, तर 1 लाख 51 हजार 48 रुग्णांचा मृत्यू झाला. एकूण बाधित लोकसंख्येच्या प्रमाणात मृत्यूचे हे प्रमाण 1.44 टक्के इतके आहे. जगामध्ये हे प्रमाण सर्वात कमी तर आहेच, परंतु; देशाच्या लोकसंख्येच्या तुलनेत अवघे पाऊण (0.75) टक्के इतके आहे. भारताची लोकसंख्येची घनता लक्षात घेतली तर कोरोना रोखण्यामध्ये भारताने मिळविलेले हे यश अमूल्य असे समजले जात आहे.