महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ११ जानेवारी – लडाखमधील चुसुल सेक्टरमधील गुरुंग व्हॅलीजवळ भारतीय सैन्याने एका चिनी सैनिकाला पकडले आहे. भारताच्या हद्दीत फिरत असल्याने त्याला पकडण्यात आले आहे. चौकशीदरम्यान आपण रस्ता चुकल्याचे या चिनी सैनिकाने सांगितले. दरम्यान, या सैनिकाची अद्यापही चौकशी सुरू आहे. प्रोटोकॉलनुसार लष्करी पातळीवरील चौकशीअंती त्याला चीनच्या स्वाधीन केले जाऊ शकते.
लष्करी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 जानेवारीला लडाखमध्ये एलएसीच्या भारतीय सीमेच्या आत एका चिनी सैनिकाला अटक करण्यात आली. चीनचा सैनिक पांगोंग तलावाच्या दक्षिण टोकाकडून पकडला गेला आहे. भारतीय लष्कराच्या म्हणण्यानुसार विहित प्रक्रियेनुसार त्याची चौकशी केली जात आहे. रस्ता भरकटल्याने तो भारताच्या हद्दीत पोहोचल्याचे चीनच्या सैन्याने स्पष्ट केले आहे. दरम्यान, गेल्या वर्षभरापासून एलएसीच्या दोन्ही बाजूंनी भारत आणि चीनचे सैन्य तैनात केले गेले आहे. आता पीएलए सैनिकासोबत प्रस्थापित निकषांनुसार व्यवहार केला जात आहे. चिनी सैनिकाने कोणत्या परिस्थितीत सीमा ओलांडली हे आता भारतीय सैन्य तपासत आहे. भारतीय सैनिकांनी चीनच्या वरि÷ कमांडरांना या घटनेची माहिती दिली आहे. वरि÷ सैन्य अधिकारी दोन्ही बाजूंनी एकमेकांशी संपर्कात आहेत.
यापूर्वी ऑक्टोबर 2020 मध्येही एका चिनी सैनिकाला भारतीय सैनिकांनी पकडले होते. हा सैनिक लडाखच्या डेमचोकमध्ये पकडला गेला. या पीएलए सैनिकाकडे नागरी आणि सैनिकी कागदपत्रे आढळली. औपचारिकता पूर्ण केल्यानंतर सदर जवानाला चिनी अधिकाऱयांच्या ताब्यात देण्यात आले होते.