मांसाहार करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची सूचना ; पशूसंवर्धनमंत्री सुनिल केदार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ११ जानेवारी – जगासह देशावर ओढावलेले कोरोनाचे संकट कमी होत असतानाच आता महाराष्ट्रात ‘बर्ड फ्लू’ च्या रुपाने आणखी एका संकटाने शिरकाव केल्याचे चित्र सध्या दिसत आहे. तब्बल ८०० कोंबड्यांचा मृत्यू परभणी जिल्ह्यात ‘बर्ड फ्लू’मुळेच झाल्याचे प्रयोगशाळेने दिलेल्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. राज्याचे पशूसंवर्धनमंत्री सुनिल केदार यांनी या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना राज्यातील जनेतच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काही महत्वपूर्ण सूचना केल्या आहेत.

आपण विशिष्ट तापमानावर अर्धातास अंडी किंवा कोंबडी यांना जर शिजवले, तर त्यातील जीवाणू मरून जात असल्याचे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झाले आहे. म्हणून महाराष्ट्रातील जनेतला एवढेच सांगणे आहे की, अंडी तुम्ही जर उकडणार असाल किंवा अंड्यांचे इतर काही पदार्थ करणार असाल अथवा चिकन खाणार असाल तर त्याला अर्धा तास ७० डिग्री अंशावर शिजवले पाहिजे. असे केल्यास त्यामधील जीवाणू मरून जातात, जे तुमच्यासाठी सुरक्षित असेल, असे पशूसंवर्धनमंत्री सुनिल केदार यांनी सांगितले आहे.

दरम्यान, आज सायंकाळी ५ वाजता ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी, राज्यातील बर्ड फ्ल्यू रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आढावा बैठक घेणार आहेत. ठाणे, दापोली परभणी व नागपूर येथील नमूने आणले असून अद्याप केवळ परभणीचा तपासणी अहवाल समोर आला आहे. अन्य ठिकाणच्या नमुन्याचे तपासणी अहवाल येणे बाकी असल्याची माहिती केदार यांनी यावेळी दिली.

तसेच, याबाबत केंद्र शासनाने देखील थोडे सतर्क होणे गरजेचे आहे. कारण, राज्याने जरी काही केले, तरी केंद्राला देखील त्यांची भूमिका पार पाडवी लागणार आहे. स्वतःची अत्यंत आधुनिक अशी प्रयोगशाळा जिथं सर्व नमूने तपासले जातील व उद्या आम्हाला भोपाळला जाण्याची गरज पडणार नाही, अशी प्रयोगशाळा महाराष्ट्र सरकारने तयार केलेली आहे. पण अद्यापही केंद्राने या प्रयोगशाळेत तपासणीसाठी परवानगी दिलेली नाही. आम्हाला केंद्राने परवानगी दिली पाहिजे.

या अगोदर २००६ मध्ये अशाप्रकारचा कहर या महाराष्ट्राने पाहिलेला आहे. राज्य शासनाने त्यावेळी देखील केंद्र सरकारची वाट न पाहता, या राज्यातील पोल्ट्री उद्योगास मदतीचा हात दिला होता. तशाच प्रकारे राज्याची यंदाही भूमिका राहणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आज सायंकाळाच्या बैठकीत या संदर्भातील निर्णय घेतले जातील. ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था सांभाळणाऱ्या पोल्ट्री उद्योगास महाविकास आघाडी सरकार वाऱ्यावर सोडणार नसल्याचे सुनिल केदार यांनी म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *