![]()
मातीपासून रंगापर्यंत सगळेच महाग; यंदा गणरायाच्या मूर्ती २० ते ३० टक्क्यांनी महाग
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ९ ऑगस्ट २०२६ ।। नागपूर : गणेशोत्सव अजून महिनाभर दूर असला तरी चितारओळीतील गल्लीबोळांमध्ये बाप्पाचे आगमन आतापासूनच जाणवू लागले आहे. कुठे मातीचा गोळा आकार घेतोय, कुठे मूर्तीच्या चेहऱ्यावर भाव उमटत आहेत, तर कुठे रंगकामाची तयारी सुरू आहे. मात्र, यंदा या आनंदावर महागाईची सावली आहे. मूर्ती तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालापासून मजुरीपर्यंत वाढलेल्या खर्चामुळे गणेशमूर्तींच्या किमती सरासरी २० टक्क्यांनी वाढल्या आहेत. काही विशेष आणि मोठ्या मूर्तींच्या बाबतीत ही वाढ तब्बल ३० टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. म्हणजे बाप्पाला घरी आणायचे असेल तर भक्तांना यंदा खिशाचा गणितही जुळवावे लागणार आहे.
तीनशे वर्षांहून अधिक इतिहास असलेल्या नागपूरच्या ऐतिहासिक चितारओळीत पिढ्यानपिढ्या मूर्तिकलेचा वारसा जपला जातो. सार्वजनिक मंडळांच्या भव्य मूर्तींपासून घरगुती गणपतींपर्यंत विविध आकारांच्या मूर्ती येथे तयार होत आहेत. मात्र माती, टिनपत्रा, रंग, सजावटीचे साहित्य आणि मजुरीच्या दरात वाढ झाल्याने मूर्तिकारांचेही गणित बिघडले आहे. चार पिढ्यांपासून मूर्तिकलेचा व्यवसाय करणारे मूर्तिकार केदार इंगळे यांच्या म्हणण्यानुसार, सरासरी दरवाढ २० टक्के असून काही प्रकारांत ती ३० टक्क्यांपर्यंत गेली आहे. कलाकारांनी भाव वाढवले म्हणून नव्हे, तर उत्पादन खर्चानेच त्यांना वाढीव किंमत घेण्यास भाग पाडले आहे.
याचा परिणाम घरगुती गणपतीच्या मूर्तीवरही स्पष्ट दिसत आहे. मूर्तिकार सुशील चौरसिया यांच्या माहितीनुसार, गेल्या वर्षी सुमारे दोन हजार रुपयांना मिळणारी एक ते दीड फूट आकाराची मातीची मूर्ती यंदा अडीच हजार रुपयांपर्यंत पोहोचली आहे. मोठ्या मूर्तींचे दरही वाढले असून बारा हजार रुपयांच्या आसपास असणारी मूर्ती आता १४ ते १५ हजार रुपयांपर्यंत विकली जात आहे. दुसरीकडे, मूर्ती तयार करण्याचे काम मात्र थांबलेले नाही. मोठ्या मूर्तींचे मातीचे काम पूर्ण झाले असून सध्या फिनिशिंग आणि कोरीव काम सुरू आहे. पुढील दोन आठवड्यांत रंगकामाला सुरुवात होणार आहे.
गणेशोत्सवाबरोबरच गोकुळाष्टमीसाठी श्रीकृष्णाच्या मूर्ती, विदर्भातील महालक्ष्मीच्या मुखवट्यांपासून मुकुट, अलंकार, मोदक आणि मूषकाच्या सजावटीच्या वस्तूही बाजारात येऊ लागल्या आहेत. श्रावण सुरू होताच चितारओळीतील लगबग आणखी वाढणार आहे. पण या सगळ्या कलाविश्वामागे एक साधा प्रश्न उभा आहे—भक्तीची किंमत वाढली नाही, पण भक्ती साकार करणाऱ्या मूर्तीची किंमत मात्र वाढली; महागाईच्या या काळात बाप्पालाही बजेटमध्ये बसवावे लागणार का? श्रद्धा तशीच आहे, उत्साह तसाच आहे; बदलला आहे तो फक्त बाजाराचा हिशेब.
