दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी ; अर्ज भरण्याची मुदत ‘या’ तारखेपर्यंत वाढली

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १२ जानेवारी – दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी काही दिलासादायक बातमी समोर येतेय. दहावी परीक्षेचा अर्ज भरण्याची मुदत 25 जानेवारीपर्यंत वाढविण्यात आलीय. दहावीच्या निम्म्या विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज अद्याप भरलेले नाहीत. अर्ज भरण्याची मुदत सोमवारी 11 जानेवारीला संपल्याने शिक्षण मंडळाने मुदत वाढवून दिली.

अद्याप मुंबईतील शाळा सुरू झालेल्या नाहीत. शाळा बंद असल्याने विद्यार्थी परीक्षेचा अर्ज भरण्यासाठीही शाळेत येत नसल्याने या विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज कसे भरायचे ?, असा प्रश्न मुख्याध्यापकांना पडलाय. अद्याप 30 ते 40 टक्के विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरणं बाकी आहे.

दहावीची परीक्षा ३ मेनंतर घेण्याचे प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी दिली. कोरोनामुळे कोलमडलेले शैक्षणिक वर्ष सुरळीत करण्याचे प्रयत्न शिक्षण विभागातर्फे सुरू आहेत.

सध्या मुंबई, ठाणे वगळून राज्यातील बहुतेक ठिकाणी नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. त्यानुसार आता पाचवी ते आठवीपर्यंत शाळा सुरू करण्यासंदर्भात आणखी काही दिवस परिस्थितीचा आढावा घेऊन याबाबतचा निर्णय घेण्यात येईल. सीबीएसईच्या दहावी, बारावीच्या परीक्षांची तारीखही जाहीर करण्यात आली आहे.

कोरोनामुळे यंदा शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक कोलमडले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात आले. तर, मुंबई आणि परिसर वगळता राज्यातील इतर भागात नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. प्रत्यक्ष शाळा सुरू नसल्या, तरी विद्यार्थी आणि पालकांचे परीक्षा कधी होणार, याकडे लक्ष होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *