महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १३ जानेवारी – भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा दुखापतींचा दौरा म्हणून ओळखला जाणार आहे. कारण या दौऱ्यात आणि दौऱ्यापूर्वी गेल्या दोन महिन्यात भारताचे तब्बल 12 खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत. दुखापतीमुळे जलदगती गोलंदाज इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी कसोटी मालिका खेळू शकले नाहीत. तर दुसऱ्या कसोटी सामन्यात दुखापत झाल्याने जलदगती गोलंदाज उमेश यादवदेखील मायदेशी परतला. त्यामुळे टीम इंडियाच्या जलदगती गोलंदाजीची धुरा जसप्रीत बुमराहच्या खांद्यावर होती. त्याला नवोदित गोलंदाज मोहम्मद सिराज आणि नवदीप सैनी या दोघांची साथ मिळाली. परंतु तिसऱ्या कसोटी सामन्यात दुखापत झाल्याने आता जसप्रीत बुमराहदेखील चौथ्या कसोटी सामन्याला मुकणार असल्याचे बोलले जात आहे. सिडनी कसोटीत अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा दुखापतग्रस्त झाला आहे, तर या सामन्याचा हिरो ठरलेल्या हनुमा विहारीच्या मांडीचे स्नायू दुखावले (हॅमस्ट्रिंग) आहेत. त्यामुळे हे दोन खेळाडूदेखील ब्रिस्बेन कसोटी सामन्यात खेळू शकणार नाहीत. लोकेश राहुलला तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी सराव करताना दुखापत झाली होती. त्यामुळे तोदेखील मायदेशी परतला आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियाचा हंगामी कर्णधार अजिंक्य रहाणेवर प्लेइंग इलेव्हन निवडणं सर्वात मोठं आवाहन असणार आहे.
रोहित शर्मा आणि शुभमन गिलच्या रुपाने गेल्या अनेक महिन्यांपासूनचा भारतीय संघाचा सलामीच्या जोडीचा प्रश्न मिटला आहे. अद्याप या जोडीने मोठी सलामी दिलेली नसली तरी सिडनी कसोटीच्या दोन्ही डावात आक्रमक आणि आश्वासक सुरुवात करुन दिली होती. त्यामुळे ब्रिस्बेन कसोटीत या दोन खेळाडूंना सलामीला पाठवलं जाऊ शकतं. सिडनी कसोटीत या दोघांनी पहिल्या डावात 70 तर दुसऱ्या डावात 71 धावांची सलामी दिली होती. पहिल्या डावात शुभमनने तर दुसऱ्या डावात रोहितने अर्धशतक ठोकलं होतं.
मधल्या फळीची जबाबदारी पुजारा, रहाणे आणि पंतवर
टीम इंडियासमोर अनेक आवाहनं असली तरी त्यांची मधली फळी मजबुत आहे. कारण मधल्या फळीची जबाबदारी चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर आहे. चेतेश्वर पुजारा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सीरिजमध्ये सुरुवातीला प्रभावहीन ठरला होता. पंरतु सिडनी कसोटी सामना वाचवण्यात त्याचाही सिंहाचा वाटा होता. विशेष म्हणजे त्याने सिडनी कसोटीच्या दोन्ही डावांमध्ये अर्धशतक ठोकलं होतं. त्यामुळे पुजाराचं फॉर्ममध्ये येणं टीम इंडियासाठी आश्वासक बाब आहे. तर हंगामी कर्णधार अजिंक्य रहाणे नेहमीच टीम इंडियासाठी भरवशाचा फलंदाज ठरला आहे. सिडनी कसोटीत त्याची बॅट तळपली नव्हती. मात्र मेलबर्न कसोटी शानदार शतक ठोकून त्याने त्याचा फॉर्म आधीच सिद्ध केला आहे. त्यामुळे टीम इंडियाची मधली फळी सक्षम हातांमध्ये आहे, असं म्हणता येईल. सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येणाऱ्या ऋषभ पंतला सिडनी कसोटीत पाचव्या क्रमांकावर पाठवण्यात आले होते. संघ व्यवस्थापनाचा हा निर्णय योग्य ठरला. तसेच 118 चेंडूत 97 धावा फटकावून पंतने त्याची ताकद दाखवली आहे. त्यामुळे ब्रिस्बेन कसोटीत ऋषभ पंत सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करु शकतो.
विकेटकीपिंगची जबाबदारी साहावर तर जडेजाच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला संधी
ब्रिस्बेन कसोटीत वृद्धीमान साहा यष्टीरक्षण करताना दिसू शकतो. कारण हनुमा विहारीच्या जागी कोणला संधी द्यायची हा प्रश्न संघ व्यवस्थापनासमोर आहे. मयंक अग्रवाल आणि पृथ्वी शॉ हे दोन फलंदाज आपल्याकडे आहेत. परंतु दोघेही सलामीवीर आहेत. त्यामुळे त्यांना सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवणे एकप्रकारचा जुगार ठरेल. अशा परिस्थितीत संघव्यवस्थापन वृद्धीमान साहालाच पसंती देऊ शकते. कारण यष्टीरक्षणात ऋषभ पंत चांगली कामगिरी करु शकलेला नाही. तसेच वृद्धीमान साहा हा सहाव्या-सातव्या क्रमांकावर फलंदाजी करतो. त्यामुळे साहाला या सामन्यात संधी मिळू शकते. अष्टपैलू गोलंदाज रवींद्र जाडेजाच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला संधी दिली जाऊ शकते. सुंदरची फिरकी चांगली आहे, तसेच वेळ पडल्यावर तो फलंदाजीदेखील करु शकतो.
सिराज आणि नवदीपची साथ कोण देणार?
तिसऱ्या कसोटी सामन्यात दुखापत झाल्याने जसप्रीत बुमराह चौथ्या कसोटी सामन्याला मुकणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान एक चांगली बातमी समोर आली आहे, ती म्हणजे बुमराह आज सकाळी टीम इंडियासोबत नेट्समध्ये सराव करताना दिसला. त्यामुळे जर बुमराह फिट झाला तर भारतीय गोलंदाजीचं नेतृत्व त्याच्याच खांद्यावर सोपवलं जाईल. परंतु बुमराहला विश्रांती दिली गेली तर भारतीय गोलंदाजी खूपच कमकुवत ठरेल. कारण मोहम्मद सिराज आणि नवदीप सैनी त्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ही पहिलीच मालिका खेळत आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील गोलंदाजीचा अनुभव नसलेल्या गोलंदाजांसह टीम इंडिया ब्रिस्बेन कसोटीच्या मैदानात उतरेल. दरम्यान, बुमराहच्या जागी कोणाला संधी मिळणार हा सर्वात मोठा प्रश्न भारतीय क्रिकेट रसिकांसमोर उभा ठाकला आहे. बुमराहऐवजी शार्दुल ठाकूरला तिसऱ्या गोलंदाजाच्या रुपात संघात स्थान मिळू शकतं. शार्दुल यापूर्वी एक कसोटी सामना खेळला आहे. तसेच काहींच्या मते टी. नटराजनला या सामन्यात संधी द्यायला हवी. दरम्यान फिरकीची कमान रवीचंद्रन अश्विनच्या खांद्यावर असणार आहे.
टीम इंडियाची संभावित प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (कर्णधार), ऋषभ पंत, ऋद्धिमान साहा, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर/जसप्रीत बुमराह, रवीचंद्रन अश्विन.