महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १४ जानेवारी – राज्यात कोरोनाचं लसीकरण 16 जानेवारीपासून सुरू होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता सीरम इंन्स्टिट्यूटकडून राज्यभरातील अनेक जिल्ह्यांमध्ये लसीचे डोस पोहोचवले जात आहेत. कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या या लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यातील मोहिमेत कोणाला सर्वात आधी लस मिळणार ती कोणाला देऊ नये आणि कसं असेल नियोजन याबाबत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे.
राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार आता ही लस 512 ऐवजी 350 सेंटरवर पाठवली जाणार आहे. राज्यातील फ्रंटलाइनवर म्हणजेच कोव्हिड योद्धे असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सर्वात आधी ही लस दिली जाणार आहे. या लसीचा प्रत्येकाला एक डोस देण्याऐवजी सुरुवातीलाच आरोग्य कर्मचाऱ्यांना या लसीचे 2 डोस पूर्ण केले जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.
आरोग्य मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोग्य कर्मचाऱ्यांना एक डोस दिल्यानंतर पुन्हा 4 ते 6 आठवड्यांच्या अंतरानं दुसरा डोस दिला जाणार आहे. आतापर्यंत राज्यात 9.63 लाख म्हणजे 55 टक्के डोस उपलब्ध झाले आहेत. सर्वात आधी कोव्हिड योद्धांना ही लस मिळणार आहे. दर दिवशी साधारण 20 हजार जणांना ही लस दिली जणार आहे.
