महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १५ जानेवारी -ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताची सुरुवात आश्वासक झाली आहे. नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु भारताने पहिल्या काही षटकांत सलामीच्या दोन्ही फलंदाजांना तंबूत धाडलं. मोहम्मद सिराजनं डेव्हिड वॉर्नरला अवघ्या एका धावेवर असताना तंबूत धाडले तर शार्दूल ठाकूरनं पहिल्याच चेंडूवर हँरिसला सुंदरकरवी झेलबाद केलं. दुसऱ्या स्लीपमध्ये असणाऱ्या रोहित शर्मानं डेव्हिड वॉर्नरचा उत्कृष्ट झेल घेतला. सध्या लाबुशेन आणि स्टिव स्मिथनं ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला आहे. अवघ्या १७ धावा असताना दोन्ही सलामीचे फलंदाज तंबूत परतले होते. त्यानंतर स्मिथ-लाबुशेन यांनी ऑस्ट्रेलियाच्या डावाला आकार दिला. पण स्मिथ ला३६ धावांवर सुंदर ने पॅव्हेलियॉन दाखवले . तर लाबुशेन ५१ धावांवर खेळत आहे तर वेड १६ धावांवर . ऑस्ट्रेलियानं दुसऱ्या सत्रात ४८ षटकांनंतर तीन गड्यांच्या मोबदल्यात १२५ धावा केल्या आहेत.
अॅडलेडच्या मानहानीकारक पराभवानंतर भारतीय संघाने अनपेक्षित ‘फिनिक्सभरारी’ घेतली. मेलबर्नवरील महाविजय आणि सिडनीमधील संस्मरणीय अनिर्णीत लढतीमुळे मालिकेमध्ये १-१ अशी बरोबरी झाली असून सर्व क्रिकेट जगताचं लक्ष या चौथ्या व शेवटच्या सामन्याकडे लागले आहे.