महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १६ जानेवारी – काही दिवसांपूर्वी भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेले माजी मंत्री एकनाथ खडसे आणि त्यांची कन्या रोहिणी यांची सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात शुक्रवारी तब्बल साडेसहा तास कसून चौकशी झाली.
खडसे यांनी भाजप सरकारमध्ये महसूलमंत्री असताना आपल्या पदाचा दुरुपयोग करत भोसरीतील जमीन खरेदी केल्याचा आरोप आहे. याच प्रकरणावरून त्यांना मंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले होते. ईडीने खडसेंना 30 डिसेंबर 2020 ला चौकशीसाठी बोलावले होते, पण कोरोनाची लक्षणे आढळल्यामुळे त्यांनी 14 दिवसांचा वेळ मागितला होता.
खडसे कुटुंबाने एका कंपनीकडून कोणतेही तारण न देता 4 कोटी रुपयांचे कर्ज घेतले. विशेष म्हणजे या कंपनीनेही अन्य कंपनीकडूनच कर्ज घेऊन खडसेंना कर्ज दिले. खडसे कुटुंबाने ती रक्कम विविध कंपन्यांच्या खात्यावर वळवली. त्यातून 2016 मध्ये पुण्यात भोसरी एमआयडीसीमधील भूखंड बेंचमार्क बिल्डकॉन कंपनीकडून खरेदी केला. हा व्यवहार मनिलॉण्डरिंगचा असावा, असा संशय आहे. ही जमीन खडसे यांच्या कन्या शारदा यांच्या नावावर असून या व्यवहाराबद्दल शारदा खडसे यांच्यावरही आरोप आहेत.
प्रदीर्घ चौकशीनंतर एकनाथ खडसे म्हणाले, मी माझ्या आरोपाबाबत सगळी माहिती व कागदपत्रे दिली आहेत. ईडीच्या अधिकार्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तरे दिली. त्यांनी जर पुन्हा चौकशीला बोलावले तर पुन्हा हजर होईन. चौकशीला सर्वप्रकारचे सहकार्य करण्याची आपली भूमिका आहे. माझ्यावर कोणताही दबाव नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.